खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी क्रीडा सुविधा गतीने उपलब्ध करुन द्या

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचना

कोल्हापूर : प्रतिनिधी

 दि. १८ जून: जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे, यासाठी जिल्ह्यातील खेळाडूंना क्रीडा सुविधा गतीने उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. 

 जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ.चंद्रशेखर साखरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी, तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण, योग प्रशिक्षक रवी कुमठेकर, अर्जुन पुरस्कार विजेत्या शैलजा साळोखे, शिव छत्रपती पुरस्कार विजेते आर.डी. पाटील, उमा भेंडीगिरी तसेच समिती सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील संरक्षक भिंत बांधकाम, जलतरण तलावाची दुरुस्ती, क्रीडांगण समपातळीत करुन घेणे ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथील जिल्हा क्रीडा संकुलाचे उत्पन्न वाढवण्यासाठी सोलर पॅनल बसविणे, एटीएम मशीन, मोबाईल टॉवर, ग्राफिक बॅनर बसविण्याची कार्यवाही करावी. अद्याप जागा उपलब्ध न झालेल्या तालुका क्रीडा संकुलांसाठी जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ जागा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे सांगून त्यासाठीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करुन घ्यावी, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करावेत, यासाठी मिशन गोल्ड योजना प्रभावीपणे राबवा. 21 जून जागतिक योग दिनी सर्व शाळांमध्ये व योग प्रशिक्षण केंद्रामध्ये योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी दिल्या.  जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे म्हणाले, शेंडा पार्क येथे प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकुलासाठीच्या जागेबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरु आहे. क्रीडा विषयक प्रलंबित कामे मार्गी लावण्यात येतील, असे सांगून 26 जून जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती दिली.