उद्यमनगर कोल्हापूर येथे कौशल्य विकास प्रदर्शन संपन्न

 

कोल्हापूर : प्रतिनिधी

दि. 16 जुलै : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व जागतिक युवा कौशल्य दिन निमित्त १५ जुलै २०२२ रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर व प्रथम एज्युकेशन फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम ऑटोमोटिव्ह ट्रेनिंग सेंटर, वाय पी पवार नगर, उद्यमनगर कोल्हापूर येथे  कौशल्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रथम एज्युकेशन फाउंडेशन १९९४ पासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. प्रथम संस्थेचे कार्य भारतात व भारताबाहेर अनेक देशांमध्ये सुरु आहे. शैक्षणिक आणि १८ ते २५ वयोगटातील बेरोजगार युवक –युवतीसाठी  कौशल्य विकास कार्यक्रम राबविले जातात.

प्रदर्शनामध्ये टूल प्रदर्शन आणि कौशल्य विकास माहिती प्रदर्शनमध्ये प्रथम एज्युकेशन फौन्डेशन व स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणीकृत प्रशिक्षण संस्थांनी स्टाँलचे आयोजन  केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सचिन चांदोरकर (प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मोबिलैजेशन प्रमुख,इंडिया) व  संजय माळी (सहाय्यक आयुक्त) कोल्हापूर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यानंतर प्रदर्शनातील कौशल्य प्रशिक्षण संस्थांच्या  स्टाँलना भेट देण्यात आली.

            दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित उमेदवारांना विविध मान्यवरांची कौशल्य विषयक व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थी, नवउद्योजक यांचे साठी मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये  अक्युप्रेशर तज्ञ अरविंद पालके  यांनी अक्युप्रेशर विषयक,  रवींद्र मुंडासे, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर, प्रा. हर्षवर्धन पंडित (सहा. प्राध्यापक,  टेकनाँलाँजी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर),  डॉ. ए. एम. गुरव (प्रा. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), सहायक आयुक्त संजय कृ.माळी  या मान्यवरांचे कौशल्य या विषयांवरती व्याख्याने झाली.

त्यानंतर कार्यक्रमात पुढे जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावार व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त  संजय माळी कोल्हापूर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण व यशस्वी उद्योजक युवक- युवतींचा सन्मान  सोहळा संपन्न झाला.  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे जिल्हा कौशल्य विकास समन्वयक श्रीमती रजनी मोटे व वरिष्ठ लिपिक श्रीमती विद्या धुमाळ यांना उल्लेखनीय कामकाजाबाबत प्रशंसनीय प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. तसेच विविध कौशल्यांचे स्टॉलनाही जिल्हाधिकारी, राहुल रेखावार, यांनी भेटी देऊन उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी“कोणतेही काम छोटे किंवा मोठे  नसते सुरुवात करणे महत्वाचे असते, आपल्या जिद्द व मेहनतीने आपले कौशल्य वृद्धिंगत करून नविन तंत्रज्ञानानुसार त्याला अद्यावत करणे गरजेचे आहे.” असा मोलाचा मूलमंत्र यशस्वी होणेकरिता  उमेदवारांना दिला.

कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्यामधील कौशल्य विकास उपक्रम राबवीत असलेल्या प्रशिक्षण संस्थांनीही सहभाग नोंदविला. प्रथम एज्युकेशन फौन्डेशन च्या श्रीमती आस्मा पठाण व श्रीमती दिपाली बागडी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी प्रथम एज्युकेशन फौन्डेशन चे औदुंबर मांगले, वैशाली कोळी, शीतल कांबळे यांनी सहकार्य केले. मनीषा कांबळे हेल्थ केअर ट्रेनिंग सेंटर च्या सेंटर यांनी उपस्थितांचे आभार मानले.