सहकारी साखर कारखान्यांना केंद्रीय अर्थसंकल्पात मोठा दिलासा

आमदार प्रकाश आवाडे

इचलकरंजीप्रतिनिधी 
दि ,१ : वस्त्रोद्योगातील लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योगांच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर एमएसएमई क्षेत्रासाठी मोठी तरतूद करण्यात आल्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर सहकारी साखर कारखान्यांना केंद्रीय अर्थसंकल्पात मोठा दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार प्रकाश आवाडे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत बोलताना व्यक्त केली.
ते म्हणाले, सहकारी साखर कारखान्यांकडून गत 10 वर्षापासून सुरु असलेल्या मागणीला यश आले आहे. केंद्र सरकारला साखर कारखान्यांकडून देय असलेल्या प्राप्तीकराच्या सुमारे 10 हजार कोटी रुपयांना सुट देण्यात आली आहे. प्राप्ती कराची रक्कम मोठी असल्याने मोठ्या आर्थिक बोजातून सहकारी साखर कारखानदारी मुक्त होणार आहे. या निर्णयामुळे सहकारी साखर कारखाने आणि पर्यायाने शेतकर्‍यांना सर्वात मोठी भेट मिळाली आहे.
आजचा केंद्राचा अर्थसंकल्प हा लघुउद्योग, शेतकरी, युवकांसाठी दिलासा देणारा आहे. शेतकर्‍यांना नैसर्गिक शेतीला चालना, कृषीक्षेत्राचे आधुनिकीकरण, कृषी तंत्रज्ञान स्टार्टसना प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प आहे. उद्योग, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. लघुउद्योजक, विद्यार्थी आदींसह अनेकांना व्हिजनरी देणारा, अर्थव्यवस्था बळकट करणारा दूरदृष्टीचा अर्थसंकल्प आहे. रोजगार निर्मिती, शेतकरी, महिला, युवक अशा सर्वसमावेशक घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही आमदार आवाडे यांनी सांगितले.