लाकूड ओढणे शर्यत : लहान गटात दिलीप पाटील यांचा बैल प्रथम

इचलकरंजी:कयूम शेख

दि:३१:मे:कर्नाटक बेंदूर सणाच्या निमित्ताने येथील इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित लाकूड ओढण्याच्या शर्यतीत मंगळवारी झालेल्या लहान गटात दिलीप पांडुरंग पाटील यांच्या बैलाने 29.8 सेकंद अशी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकविला. तर रामा दत्तात्रय नंदनवाडे यांच्या बैलाने 31.1 सेकंद व जोतिबा बाळू गायकवाड यांच्या बैलाने 31.9 सेकंद अशी वेळ नोंदवत अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला.

दरम्यान, आज (बुधवार) मोठ्या गटातील शर्यती आणि 1 जून रोजी सुट्टा बैल पळविणे स्पर्धा होणार असून 3 जून रोजी श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह चौकात जनावरांचे भव्य असे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

इचलकरंजी शहराचे अधिपती श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी सुरु केलेल्या पारंपारिक लाकूड ओढण्याच्या शर्यती इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदुर उत्सव मंडळाच्या वतीने अखंडीतपणे सुरु ठेवल्या असून त्याला शतकोत्तर परंपरा आहे. येथील डीकेटीई नारायणमळाच्या पटांगणावर बुधवारी लहान गटातील लाकूड ओढण्याच्या शर्यती पार पडल्या. या गटात एकूण 22 बैलांची नोंद झाली होती. शासन नियमांचे पालन करुन शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. कोणताही गोंधळ वा अनुचित प्रकार घडू नये तसेच शर्यतीचा आनंद सर्वांचा लुटता यावा यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. शर्यती पाहण्यासाठी येणार्‍या प्रेक्षकांसाठी गॅलरीची सोय करण्यात आली आहे.

प्रारंभी प्रगतशील शेतकरी उत्तम आवाडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, देवांशिष पाटील, संभाजी कम्मे, आनंदा लंगोटे, अशोक शिरसाट यांच्या हस्ते मैदानाचे व लाकडाचे पुजन करण्यात आले. शर्यती पाहण्यासाठी तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होती. यामध्ये प्रथम क्रमांकास 75 हजार रुपये शिल्ड व चांदीची फिरती गदा, द्वितीय क्रमांकास 51 हजार रुपये व शिल्ड आणि तृतीय क्रमांकास 31 हजार व शिल्ड अशी बक्षिसे दिली आहेत. 5 जून रोजी पारंपारिक कर तोडण्याच्या दिवशी सर्वच विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे दिली जाणार आहेत.

यावेळी इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते, उपाध्यक्ष नंदू पाटील, खजिनदार अहमद मुजावर, शांताप्पा मगदूम, पापालाल मुजावर, शिवाजी पाटील, राहुल घाट, गजानन लोंढे, शिवाजी काळे, शिवाजी माळी, राजू चनविरे, किशोर पाटील, सागर मगदूम, बजरंग कुंभार, राजू दरीबे, बाबासो पाटील, तानाजी भोसले, सागर गळदगे, सागर कम्मे, किशोर निंबाळकर, इरफान अत्तार, आरिफ अत्तार आदींसह असंख्य शर्यतप्रेमी उपस्थित होते.