सुमारे साडेआठ कोटींपेक्षा जास्त रक्कम आंबा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही लगेच सुरु करण्याचे मुख्यमंत्री यांनी दिले निर्देश

मुंबई:प्रतिनिधि

दि:०५:सप्टेंबर: अवकाळी पावसामुळे २०१५ मध्ये कोकणात आंब्याचे नुकसान झाल्यामुळे तीन महिन्याची व्याजमाफी आणि पुनर्गठीत कर्जावरील व्याज अशी सुमारे साडेआठ कोटींपेक्षा जास्त रक्कम आंबा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही लगेच सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आंब्याचे घटणारे उत्पादन, किडीमुळे होणारे नुकसान याबाबतीत कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स नेमून त्यात कोकण कृषी विद्यापीठ आणि शेती तज्ज्ञांचा समावेश करून तातडीने बैठक घ्यावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

जानेवारी , फेब्रुवारी, मार्च २०१५ अशा तीन महिन्यात अवकाळी पावसामुळे नुकसानीसाठी आंबा शेतकऱ्यांना पिक कर्जावरील माफी जाहीर झाली होती. १२ हजार ५१३ कर्जदारांना ३ कोटी ३५ लाख ९३ हजार १७८ इतकी व्याज माफी आणि कर्जाचे पुनर्गठनापोटी ५ कोटी २६ लाख ५८ हजार ४३३ अशी व्याज रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नव्हती ही बाब आज शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाहीच्या सूचना वित्त विभागाला दिल्या.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मोठ्या प्रमाणावर हापूस आंबा पिकतो. विमा, उत्पादन वाढ, औषध फवारणी तसेच उत्पादकांना प्रोत्साहन, संशोधन यासाठी काजू बोर्डाप्रमाणे कोकणातील प्रस्तावित आंबा बोर्ड सुरु करण्याची कार्यवाही तातडीने करुन त्या बोर्डाची व्याप्ती व्यापक ठेवा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

काजू बोर्डाला सध्या २०० कोटी दिले असून येत्या ५ वर्षात १३०० कोटी देण्यात येणार आहेत. ओल्या काजूला १० टक्के जास्त दर आहे. तसेच कोकणातल्या काजूला चांगली चव आहे, यादृष्टीने काजूवरील प्रक्रिया उद्योगांना सुद्धा प्रोत्साहन मिळाले पाहिजे यावर देखील या बैठकीत चर्चा झाली.

सिंधुरत्नसाठी घोषणा झाल्यापासून अद्यापपर्यंत निधी उपलब्ध झाला नसल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले असता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला पुढील पुरवणी मागण्यांमध्ये प्रत्येकी १०० कोटी रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वित्त विभागाला दिले. कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना अंतिम टप्प्यावर आली असून या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थाने कोकणाची आणि विशेषत: तेथील शेतकरी, उत्पादक यांची उन्नती करता येईल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.