कडवई:नियाज खान :
दि.१५ : वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्यासोबतच व्यसनांपासून दूर राहून निरोगी व उज्ज्वल भविष्य घडविणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने युवासेनेच्या वतीने कडवई येथील ई.एस.के. कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर सुरक्षा आणि व्यसनमुक्ती मार्गदर्शन’ या विशेष प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मितेश केणी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याच्या उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच तरुणांनी व्यसनांच्या आहारी न जाता आरोग्य, शिक्षण आणि करिअरकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले.
या मार्गदर्शन शिबिराला परिसरातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. कडवई इंग्लिश स्कूल, महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवई, काळसेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स तसेच भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
कार्यक्रमास जमातुल मुस्लिमीन-कडवईचे चेअरमन सिकंदर जुवळे, ई.एस.के.चे अध्यक्ष सादिक काझी, युवासेनेचे उपतालुका प्रमुख सुधीर चाळके, विभाग प्रमुख संदेश फडकले आणि उपविभाग प्रमुख निहाल खान यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण सावंत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सुधीर चाळके, संदेश फडकले व निहाल खान यांच्यासह कार्यकर्त्यांच्या नियोजनाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.