सुळकूड योजनेसाठीचे दि. ३ नोव्हेंबरचे रस्ता रोको आंदोलन स्थगित.

कृति समितीचा निर्णय

इचलकरंजी:प्रतिनिधी 

दि. १ – “इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवार दि. ३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले रस्ता रोको आंदोलन, राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यातील सद्यस्थिती, राज्यातील चिघळलेले वातावरण, अनेक जिल्ह्यातील जाळपोळ, दगडफेक व हिंसक घटना व त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न या सर्व परिस्थितीमुळे स्थगित करण्याचा आलेले आहे. तसेच दिवाळी झाल्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा व कार्यक्रम निश्चित करण्यात येईल.” असा निर्णय समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समितीच्या वतीने सर्व इचलकरंजीकर जनतेच्या माहितीसाठी जाहीर प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आलेली आहे.

सुळकूड पाणी योजना त्वरीत कार्यान्वित करण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवार दि. १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या लाक्षणिक उपोषणाची सांगता करतेवेळी दसरा झाल्यानंतर पुढील आंदोलन निश्चित करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार दि. ३ नोव्हेंबर रोजीचे रस्ता रोको आंदोलन जाहीर करण्यात आले होते. तथापि सद्यस्थितीतील महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या तीव्र भावना, उपोषणामुळे निर्माण झालेली अति संवेदनशील परिस्थिती व राज्यातील शांतता व सुव्यवस्था परिस्थिती ध्यानी घेता पाणी प्रश्नीचे आंदोलन तहकूब करणे उचित ठरेल या भूमिकेतून समन्वय समितीने आंदोलन स्थगित केले आहे अशीही माहिती या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समितीच्या समन्वय समितीच्या महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना कार्यालय, महासत्ता चौक, येथे आज झालेल्या बैठकीत वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये अजीतमामा जाधव, शशांक बावचकर, मदन कारंडे, रविंद्र माने, सागर चाळके, विठ्ठल चोपडे, कॉ. सदा मलाबादे, कॉ. सुनील बारवाडे, कौशिक मराठे, अभिजित पटवा, राजू आलासे, राहुल सातपुते, जाविद मोमीन, विजय जगताप, चंद्रकांत शेळके, संजय तेलनाडे इ. मान्यवर उपस्थित होते.