इचलकरंजी :विजय मकोटे
दि .१८:येथील श्री काळा मारुती मंदिर रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त रविवारी मुख्य दिवशी तब्बल नऊशे किलो फुलांनी सजवण्यात आले होते. मंदिर आणि गाभार्याची नेत्रदीपक सजावट सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमही सुरू असून दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसत होती. दरम्यान, शनिवारी श्री रामचरित मानस रामायणमध्ये प्रभू श्रीराम व माता सीता यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.
येथील श्री काळा मारुती मंदिर सुमारे 200 वर्षापूर्वीचं संस्थानकाळातील आहे. मंदिराचे वैशिष्ट्य असे की हनुमानाची मूर्ती दक्षिणमुखी असुन उजव्या हातात संजीवनी व डाव्या हातात गदा असून नवसाला पावणारा मारुती अशी ख्याती आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळा मारुती आरती भक्त मंडळ वर्धापन दिनाचे औचित्य साधत 13 डिसेंबरपासून विविध कार्यक्रमही सुरू आहेत. त्यामध्ये दररोज दुपारी 2 ते 6 या वेळेत मराठी श्री रामचरित मानस रामायणचा भव्य स्क्रीनद्वारे सामुदायिक संगीत पारायण सोहळा सुरु आहे. तर दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत सांप्रदायिक किर्तन सुरु आहे. त्यामुळे मंदिरात देवदर्शन आणि या कार्यक्रमांसाठी भाविकांची गर्दी दिसत आहे.
मार्गशिर्ष पंचमी हा मंदिर वर्धापनाचा मुख्य दिवस असल्याने 900 किलो फुलांनी मंदिर आणि गाभार्याची नयनरम्य अशी सजावट करण्यात आली आहे. त्यासाठी परिसरातील सुमारे 2 हजार भक्तांनी फुले ओवण्याची सेवा केली. रविवार 24 डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रम होणार असून याचदिवशी महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष प्रकाश आवाडे, स्थायी अध्यक्ष नंदु उर्फ बाबासो पाटील, उपाध्यक्ष मनोहर हिराणी, दत्तात्रय मेटे, देवराज जोशी, मारुती देशिंगे, श्रीकांत टेके, गोविंद सोनी, मिश्रीलाल बजाज, सौ. वैशाली गजगेश्वर, सौ,नम्रता देशमाने आदींसह सर्वच भक्तगण परिश्रम घेत आहेत.