बालाजी शिक्षण समूहाचा वैभवशाली दैदीप्यमान रौप्य महोत्सव

इचलकरंजी:विजय मकोटे

महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणजेच इचलकरंजी शहर.वस्त्र नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहरात कामगार गोरगरीब, कष्टकऱ्यांची संख्या जास्त.बदलणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेत शिक्षणाची सांगड घालणे तशी अशक्य गोष्ट.या वस्त्रा नगरीचा कायापालट शिक्षणाशिवाय होणार नाही पण दर्जेदार शिक्षण कितपत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते हा प्रश्न ही होताच. आधुनिक ,दर्जेदार आणि दीर्घकाळ टिकणारे शिक्षण मिळावे यासाठी श्री सद्गुरु पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या आशीर्वादाने विद्याधनम सर्वधन प्र धानम या ध्येयाने प्रेरित होऊन कष्टकरी ,कामगार व दीनदलित कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत त्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विचाराने प्रेरित होऊन मा श्री मदनरावजी कारंडे साहेब व त्यांच्या सहकार्यानी १९९९  साली श्री सद्गुरू पंत महाराज शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून विक्रम नगर सारख्या कामगार ,कष्टकरी वसाहतीमध्ये श्री बालाजी बालमंदिर व श्री बालाजी माध्यमिक विद्यालयाची सुरुवात केली. आज मितीस ज्ञानार्जनाच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा, आधुनिक शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारा, परिपूर्ण सोयी सुविधा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण पद्धतीत बदल करणारा श्री बालाजी शिक्षण समूहाचा कल्पवृक्ष आज विविध शाखांच्या माध्यमातून विस्तारलेला आहे.आज श्री बालाजी शिक्षण समूहाआपला  रौप्य महोत्सव उत्साहात साजरा करत आहे त्याबद्दल थोडेसे …..

विक्रम नगर येथील शास्त्री गल्लीमध्ये एका मागाच्या शेडमध्ये श्री बालाजी माध्यमिक विद्यालयाचे छोटेसे रोपटे लावून शिक्षण क्षेत्रात बालाजी शिक्षण समूहाची मुळे पसरू लागली. सुरुवातीस इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीचे वर्ग सुरू झाले पण असंख्य अडचणी आ वासून  उभ्या होत्या. वर्गाच्या भिंतींची रचनाच अशी होती की पाचवीच्या वर्गात शिकवलेले आठवीच्या वर्गात ऐकू यायचे तर आठवीच्या वर्गात शिकवलेले पाचवीच्या वर्गात ऐकू यायचे . पावसाळ्यात तर संपूर्ण वर्गात पाणी    शिरायचे. वरूण राजाचा अभिषेक शिकणारे विद्यार्थी व शिकवणारे शिक्षक दोघांवर व्हायचा पण या परिस्थितीतही आत्मविश्वास ढळू न देता नेटाने शिक्षणाचे हे पवित्र कार्य चालूच ठेवले. इयत्ता पाचवीच्या वर्गात 35 तर इयत्ता आठवीच्या वर्गात 23 विद्यार्थी सुरुवातीस शिक्षण घेत होते.जे बालाजी शिक्षण समूहाच्या जडणघडणीचे साक्षीदार ठरले. दर्जेदार शिक्षणाचा वसा मुलांना बालवयातच मिळावा आणि वाढणाऱ्या अंकुरास ज्ञानाचे पाठबळ मिळावे म्हणून 1999   सालीच  श्री बालाजी बाल मंदिराची सुरुवात झाली. बालवाडीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलांच्या पुढील शिक्षणाची म्हणजेच  प्राथमिक शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून सन 2002 साली श्री बालाजी विद्यामंदिराची सुरुवात करण्यात आली आणि पुढे विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येसोबत या शाखांचे वर्गही वाढू लागले.बालाजी बाल मंदिराची सुरुवातही 25 विद्यार्थ्यांच्या एका वर्गाने झाली आज पाच वर्गात 150 विद्यार्थी शिक्षण घेताना दिसून येतात.मर्यादित प्रवेशाने विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होत असल्याने आज पालकांना बालाजी मध्येच प्रवेश हवा आहे.सन 2002 साली श्री बालाजी विद्यामंदिराची सुरुवात ५० विद्यार्थ्यांच्या एका वर्गाने झाली आज तेथे आठ वर्गात ४७४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

प्राथमिक शिक्षणानंतर आपला विद्यार्थी श्री बालाजी माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेऊ लागला सुरुवातीस 88 विद्यार्थी संख्या असलेले माध्यमिक विद्यालय आज 18 वर्गातून 1097 विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करताना दिसून येते. बालवाडी पासून माध्यमिक पर्यंतचे विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होत असतानाच इंग्रजी शिक्षण ही काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून सन 2005 साली श्री बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल सुरू झाले.शिस्तबद्ध नियोजनामुळे सुरुवातीस पंधरा विद्यार्थी संख्या असलेले स्कूल आज 650 विद्यार्थ्यांना ज्ञानर्जन करत आहे.पालकांचा बालाजी शिक्षण समूहावरचा विश्वासच बालाजीच्या विविध शाखांना निर्माण करत होता. बदलत्या काळासोबत बदलणारे शिक्षण व शिक्षण व्यवस्था यांचे महत्त्व वाढत होते. शालेय शिक्षणानंतर विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाची सोय व्हावी म्हणून तसेच भविष्यकालीन जीवनामध्ये बालाजीचा विद्यार्थी वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात तसेच इतर क्षेत्रांमध्ये कुठेही कमी पडता कामा नये म्हणून व दहावी नंतर पुन्हा प्रवेश प्रक्रिया यापेक्षा बालवाडी पासून बारावीपर्यंतचे शिक्षण बालाजी शिक्षण समुहातच मिळावे यासाठी सन 2007 साली श्री बालाजी जुनिअर कॉलेज सुरू करून सायन्स विभाग चालू झाला. विद्यार्थ्यांना व्यावसायिक व व्यावहारिक ज्ञान मिळावे तसेच त्यांचे कौशल्य विकसित व्हावे यासाठी सन 2008 साली श्री बालाजी जुनिअर कॉलेजमध्ये कॉमर्स विभाग सुरू करण्यात आला.सुरुवातीस चाळीस विद्यार्थ्यांची ही संख्या आज सायन्स विभाग व कॉमर्स विभाग मिळून 506 पर्यंत वाढलेली आहे. कारण विद्यार्थ्यांची शिस्त, सुरक्षित वातावरण, दर्जेदार शिक्षण आणि तेवढ्याच तळमळीचा शिक्षक वर्ग. शिक्षण क्षेत्रातील इंग्लिश मेडियमची वाढती मागणी, विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन बालाजीच्या छत्राखालीच प्रभावशाली दृष्टीकोनातून केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात सी. बी. एस. ई पब्लिक स्कूल डे बोर्डिंग टाकवडे या ठिकाणी सन 2009 साली स्थापन झाले.आज दर्जेदार शिक्षण, शिस्त ,अनुशासन व नियोजनामुळे येथे अल्पावधीतच तब्बल 1250 विद्यार्थी शिक्षण घेताना दिसून येतात.बदलत्या युगातील बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शिक्षणाचा पाया शालेय शिक्षणामध्येच घातला जावा .त्यांचे इंग्रजी विषयाचे ज्ञान वाढावे.फिजिक्स,केमिस्ट्री ,बायोलॉजी चे ज्ञान आतापासूनच त्यांना मिळावे यासाठी श्री बालाजी ओलंपियाड अकॅडमीची स्थापना 2020 साली झाली. दहावीनंतर बरेच विद्यार्थी लातूर पॅटर्नला झुकते माप देत होते. यासाठी लांबच्या पल्यासोबतच त्यांचा पैशाचा अपव्यय् टाळावा त्यांच्या शिक्षणाची सोय इथेच व्हावी यासाठी 2021 साली बालाजी करिअर डेव्हलपमेंट अकॅडमीने लातूर पॅटर्न इचलकरंजी शहरात सुरू करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस योग्य दिशा दिली.

अल्पावधीतच येथील सुविधा व तज्ञ प्राध्यापकांमुळे संपूर्ण शहरात नाव होऊ लागले यावर्षी म्हणजेच 2024 साली आठवी नंतरच विद्यार्थ्यांचा महाविद्यालयीन पाया भक्कम होऊन स्पर्धा परीक्षे सोबत पुढील शिक्षणाचा योग्य मार्ग त्यांना मिळावा म्हणून बालाजी फोर इयर प्रोग्रॅम अकॅडमीची स्थापना करण्यात आली.

बालाजी शिक्षण समूहाने अल्पावधीतच पालकांचा विश्वास मिळवला त्यामुळे आज दहा शाखांमधून 5800 विद्यार्थी येथे शिक्षण घेत असून शिस्त ,स्वच्छता ,अनुशासन ,योग्य नियोजन, आधुनिक शिक्षण पद्धती, विज्ञान तंत्रज्ञानाशी सांगड, शिक्षण समूहाच्या सर्व सोयीने परिपूर्ण टुमदार, टोलेजंग, स्वच्छ, सुंदर इमारती व तळमळीने शिकवणारा शिक्षक वर्ग आणि शालेय परिसरा सोबतच शालेय इमारतींचे स्वच्छतेच्या माध्यमातून पावित्र्य जपणारा कर्मचारी वर्ग यामुळे पालक वर्गाची बालाजी शिक्षण समूहास पहिली पसंती दिसून येते.आज कला ,क्रीडा ,साहित्य, नाट्य ,शालाबाह्य स्पर्धा, वक्तृत्व, निबंध स्पर्धा, स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांनी मिळवलेले उज्वल यश व समाधानी पालक वर्ग तसेच विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असणारे विद्यार्थी बालाजी शिक्षण समुहाचा खरा मानबिंदू ठरत आहेत. पालकांच्या अपेक्षा पूर्ण करून विद्यार्थी घडवण्याचा हा वसा 25 वर्षांपासून अविरतपणे चालूच आहे आणि चालूच राहील यात तिळमात्र शंका नाही. भविष्यात उच्च शिक्षणाची सोय करून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणही दर्जेदार मिळावे असा संस्थेचा मानस असून बालाजी शिक्षण समूहाच्या या नव्या शाखेचीही पालक व विद्यार्थी वर्गामध्ये प्रचंड उस्तुकता असलेली दिसून येते.