इचलकरंजी:प्रतिनिधी
दि. १ जून:ऊस विकास योजनेच्या माध्यमातून कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने नवनविन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करत ऊस उत्पादक सभासद शेतक-यांना सातत्याने अधिकाधिक उत्पन्न मिळण्यासाठी प्रोत्साहन दिलेले आहे. त्याच अनुषंगाने कारखाना व इफको यांच्या संयुक्त सहकार्यातून सुरू केलेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर ड्रोन फवारणी अभिनव योजनेचा लाभ सभासद शेतक-यांनी घ्यावा असे आवाहन कारखान्याचे केन कमिटी चेअरमन डॉ. राहुल आवाडे यांनी केले.
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि इफको यांच्या संयुक्त सहकार्यातून टाकवडे वेस परिसरातील देवगोंडा कागवाडे यांच्या ऊस क्षेत्रात कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर ड्रोन फवारणी अभिनव योजनेअंतर्गत ड्रोनद्वारे नॅनो युरिया तसेच इतर द्रवरूप खते व किटकनाशके यांची फवारणी सुरू करण्यात आली. याचा शुभारंभ कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे आणि ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
डॉ. राहुल आवाडे यांनी पुढे बोलताना सांगीतले कि, कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे आणि ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने स्थापनेपासून ऊस विकास योजना शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहोचवून उत्पन्न वाढीसाठी हवे ते सहकार्य दिले आहे. रासायनिक खत ही पारंपारिक पध्दतीने पिकाला देताना त्याची फक्त २५ ते ३० टक्के कार्यक्षमता वापरली जाते व ७० ते ७५ टक्के वाया जातो. वाया जाणा-या युरियामुळे जमिनीतील सुक्ष्मजिवाणू, माती व पाणी प्रदूषीत होत असलेने इफकोने नविन तंत्रज्ञानाचा वापर करून नॅनो युरिया व नॅनो डीएपी या द्रवरूप रासायनिक खतांची निर्मीती केली आहे. ही द्रवरूप खते फवारणीद्वारेच द्यावी लागतात. या नॅनो द्रवरूप खतांची किमान ७५ टक्के कार्यक्षमता वापरली जाते. द्रवरूप खते योग्य प्रमाणात उच्च कार्यक्षमतेसह वापरली जावून उर्जा, पाणी, वेळ श्रम आणि खर्चामध्ये मोठी बचत होवून शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत निश्चितपणे होते. सध्या फक्त ड्रोन फवारणीचा प्रती एकर खर्च रू. ६०० ते ७०० इतका आहे. कारखाना व इफको यांच्या संयुक्त सहकार्यातून ऊस पुरवठा करणा-या सभासद व बिगर सभासदांना प्रती एकर ३०० रुपये या सवलतीच्या दरामध्ये बिनव्याजी क्रेडीटवर ड्रोनद्वारे ऊस विकास योजनेतून दिले जाणारे नॅनो युरिया व इतर सुक्ष्म अन्नद्रव्ये आणि किटकनाशके यांची फवारणी करून दिली जाणार आहे. तरी ड्रोन फवारणी मागणीची नोंद शेती सर्कल व गट ऑफीसकडे करून या संधीचा लाभ शेतकरी बंधूंनी घेणेबाबत आवाहन केले.
आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगीतले कि, प्रत्येक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान वापरणे ही काळाची गरज आहे. कारखान्याने सर्वात प्रथम ऊस तोडणी यंत्राची सुरवात केली आज संपूर्ण राज्य भरात ऊस तोडणी यंत्राने तोडणी केली जात आहे. मजूरांद्वारे ऊस तोडणी केल्यानंतर तो ऊस ट्रेलरमध्ये भरण्यकरिता मजूराला ऊसाची मोळी घेवून फळीवरून धोकादायक परिस्थीतीत चढावे लागते. याकरिता कारखान्याने ऊस मोळी भरणी मशिन (कन्वेअर बेल्ट) तयार केला. ज्याची हाताळणी सहजपणे करून वाहनामध्ये ऊस भरणे कमी श्रमामध्ये केले जावू लागले आहे. ऊस लागण व खोडवा पिकातील गवताळ वाढ व बियाण्यामार्फत पसरणा-या रोगांचा प्रतिबंध करणेकरिता कारखाना ऊस बियाणे मळा क्षेत्रावरती ऊस संशोधन केंद्र कोईमत्तूर निर्मीत SETT TREATEMENT DEVICE हे ऊस बेणे प्रक्रिया मशिन बसविण्यात आले आहे. याचा लाभ जास्तीतजास्त सभासद शेतक-यांनी घ्यावा. याचबरोबर आज पारंपारिक पध्दतीने मातीवर टाकण्यात येणा-या रासायनिक खतांच्या पध्दतीऐवजी ड्रोनद्वारे नॅनो द्रवरूप खते फवारणी आणि समूह शेतीची गरज आहे. अशा शास्त्रोक्त पध्दतीने शेती केल्यास उत्पन्नात भर पडेल. त्यासाठी कारखान्याच्या वतीने शास्त्रज्ञांच्या माध्यमातून जमीन, पाणी याचा अभ्यास करून त्यांच्या सूचनेनुसार फवारणी केली जाईल. वर्षभरात चार फवारण्या केल्यास खताची एकरी दोन ते तीन हजार रूपये वाचणार आहेत. त्याचबरोबर सध्याच्या ऊस उत्पादनात एकरी ४ ते ५ टनांची वाढ होणार आहे. त्यातून शेतक-यांचा फायदा होणार असल्याचे सांगत शेतक-यांनी या ड्रोन फवारणी योजनेचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले.
प्रास्ताविक जनरल मॅनेजर (केन) किरण कांबळे यांनी केले. याप्रसंगी इफकोचे कोल्हापूर क्षेत्र अधिकारी विजय बुणगे ड्रोनधारक कपिल पाटील, संचालक आदगोंडा पाटील, सूरज बेडगे, अभय काश्मिरे, शितल आमण्णावर, संजय कोथळी, व शेखर पाटील, उपमुख्य शेती अधिकारी भास्कर पट्टणकुडे, बापूसो पाटील, बाबासो साळुंखे, देवगोंडा कागवाडे, राजू पाटील (टाकवडेकर), शिवाजी काळे, अमर नाईक, बंडू कोरे, दिलीप कुरणे, महावीर बेडक्याळे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार राहुल घाट यांनी मानले.