तळसंदेतील हॉस्टेलमध्ये अमानुष मारहाण; व्हिडिओ व्हायरल, पालक वर्गात संतापाची लाट

हातकणंगले तालुक्यातील धक्कादायक प्रकार; रेक्टरविरोधात गुन्हा दाखल

कोल्हापूर : रेणू पोवार 
दि.१० :हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील एका निवासी हॉस्टेलमध्ये काही विद्यार्थ्यांनी लहान विद्यार्थ्यांना बेल्ट, बॅट आणि दांडक्याने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, पालक वर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही वरिष्ठ विद्यार्थी लहान मुलांना गॅलरीमध्ये उभे करून निर्दयीपणे मारहाण करताना दिसत आहेत. हातात बेल्ट, बॅट, दांडके घेऊन ते विद्यार्थ्यांवर तुटून पडताना दिसतात. इतकेच नव्हे तर एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्वच्छतागृहात हाताशी सापडेल त्या वस्तूने मुलांना मारहाण केल्याचे दृश्य स्पष्टपणे दिसून येते.

या घटनेनंतर दोन दिवसांपूर्वीच याच हॉस्टेलमध्ये झालेल्या मारहाणीत सिद्धीविनायक सनी मोहिते (वय १६ , रा. उचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) हा विद्यार्थी जखमी झाला होता. पहाटे पाचच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर पेठवडगाव पोलिस ठाण्यात संबंधित हॉस्टेलच्या रेक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांचा मुलगा दहावीमध्ये शिक्षण घेत असून तो याच हॉस्टेलमध्ये राहतो६  ऑक्टोबर रोजी किरकोळ कारणावरून त्याचा सहाध्यायी पृथ्वीराज कुंभार याच्यासोबत वाद झाला होता. या वादानंतर आरोपीने दोघांनाही ताकीद दिली होती. त्याच कारणावरून पीटी परेडवेळी आरोपीने विद्यार्थ्याला स्टेजवर नेऊन बेदम मारहाण केल्याची माहिती फिर्यादीने दिली आहे.

दरम्यान, या व्हायरल व्हिडिओनंतर जिल्हाभरात खळबळ उडाली असून, अशा अमानुष प्रकारांना जबाबदार असलेल्या संस्थाचालकांवर आणि हॉस्टेल प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तथापि, हॉस्टेल प्रशासन आणि पोलिसांकडून अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

पालकांकडून मात्र संतप्त प्रतिक्रिया येत असून, “हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे सुरक्षेचे काय? इतक्या निर्दयी पद्धतीने मुलांना मारहाण होत असताना जबाबदार कुठे आहेत?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!