मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याच्या मागणीवर मा.सुश्री बहन मायावती जी ठाम

एसआयआर' प्रक्रियेला बसपाचे सशर्त समर्थन

 पुणे:-प्रतिनिधी
दि:-११ देशातील सर्व निवडणुका मत पत्रिकेवर घेण्यात याव्यात. कुठल्या कारणाने ते शक्य झाले नाही तर, ‘व्हीव्हीपॅट’ मध्ये पडणाऱ्या सर्व स्लिपची बूथनिहाय मोजणी करून ती ईव्हीएम मधील मतदानाशी जुळवावी, अशी आग्रही मागणी बहुजन समाज पक्षाने केली आहे. 
निवडणुकीदरम्यान तसेच निकालानंतर अनेकदा तक्रारी व संशय व्यक्त केला जातो. निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा पूर्ण विश्वास बसावा, यासाठी हे बदल आवश्यक असल्याचे मत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री, देशाच्या आयरन लेडी मा.सुश्री बहन मायावती यांनी व्यक्त केले, अशी माहिती राज्याचे महासचिव डॉ.हुलगेश चलवादी यांनी दिली.बसपा ‘एसआयआर’ च्या विरोधात नाही. मात्र, मतदार याद्यांमध्ये नाव समाविष्ट करण्याकरिता दिलेली कालमर्यादा अत्यंत कमी आहे. बीएलओ वरील कामाचा व्याप त्यामुळे वाढत असून अनेकांनी आपले प्राण ही गमावले आहेत. अशात ज्या राज्यांमध्ये सध्या निवडणुका नाही त्या ठिकाणी ही काल मर्यादा वाढवावी, अशी मागणी बसपाची आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले.एसआयआर चे कार्य घाईघाईत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर अनेक वैध मतदार, विशेषतः जे गरीब आहेत आणि रोजगारासाठी बाहेर गेलेल्यांची नावे मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दिलेल्या मतदानाच्या संवैधानिक अधिकारापासून ते वंचित राहू शकतात, अशी बसपाची भूमिका असल्याचे, डॉ.चलवादी यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीत गुन्हेगारी इतिहास असलेल्या उमेदवारांबाबतच्या सर्व औपचारिकता पूर्ण करण्याची जबाबदारी पक्षा ऐवजी संबंधित उमेदवारावर असावी. एखाद्या उमेदवाराने आपला गुन्हेगारी इतिहास लपवला असल्याचे आढळून आले, तर त्यासंदर्भातील सर्व प्रकारची कायदेशीर जबाबदारी त्याच्यावर असावी, पक्षावर नाही; अशी भूमिका बसपा ची असल्याचे देखील डॉ.चलवादी म्हणाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!