उपमुख्यमंत्र्यांच्या अपघाती मृत्यूनंतरच्या राजकारणामुळे जनता संभ्रमात दादांच्या कार्यकर्तृत्वावर अन्याय होत असल्याची भावना: डॉ.हुलगेश चलवादी
पुणे: प्रतिनिधी
दि.४: पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यसम्राट, कर्तव्यदक्ष, हजरजबाबी आणि सर्वसामान्यांचे लाडके नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ‘दादा’ यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर उफाळून आलेल्या राजकारणामुळे सामान्य जनतेमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण केली जातेय, यामुळे दादांच्या कार्यकर्तृत्वावर अन्याय होत असल्याची भावना माजी नगरसेवक व बहुजन नेते डॉ.हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केली आहे.
डॉ.चलवादी म्हणाले की, “अजित दादांसारखा नेता पुन्हा होणे शक्य नाही. त्यांच्या निधनाने राज्यभरात शोककळा पसरली असताना, तो शोक संपण्याआधीच राजकीय आरोप-प्रत्यारोप, अंतर्गत दुही आणि अपघाताबाबत पसरवला जाणारा संशय हा अत्यंत दुर्दैवी आहे.” अशा वक्तव्यांमुळे केवळ नागरिकच नव्हे तर दादांचे लाखो समर्थकही संभ्रमात सापडले असल्याचे त्यांनी नमूद केले.दोन्ही राष्ट्रवादी पक्षांतील अंतर्गत मतभेद आणि सार्वजनिक पातळीवर होणारी विधाने ही दादांच्या आयुष्यभराच्या कार्यावर सावली टाकणारी ठरत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. “दादांचे कार्य, त्यांचे निर्णय आणि त्यांनी जनतेसाठी केलेले योगदान यावरच चर्चा व्हायला हवी, अपघातावरून राजकारण करून संभ्रम निर्माण करणे योग्य नाही,” असेही ते म्हणाले.यामुळे राज्य सरकारने या प्रकरणात लक्ष घालून अपप्रचार, संशय आणि गैरजबाबदार वक्तव्यांना आळा घालावा, असे आवाहन डॉ. हुलगेश चलवादी यांनी केले आहे.राज्यातील नेत्यांनी वक्तव्य करताना कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी तसेच अजित दादांबाबत असलेली जनभावना लक्षात घेऊनच विधाने करावीत, असे आवाहनही डॉ.चलवादी यांनी केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.