गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त
जिल्ह्यात विविध उपक्रमांद्वारे जनजागृती
सांगली,अय्यान पटेल
दि. 14 :‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी नवी मुंबई येथील ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांद्वारे व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.
नवी मुंबई येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने तसेच गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे त्याग, बलिदान आणि मानवतेसाठीचे महान कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मिरज येथील महानगरपालिका शाळा क्रमांक ९ व २३ तसेच सांगली येथील महानगरपालिका शाळा क्र. ४५ मधील विद्यार्थ्यांनी रॅली काढून जनजागृती केली. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
मिरज येथील चाँद उर्दू हायस्कूलमध्ये आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी देशप्रेम, सामाजिक ऐक्य आणि नैतिक मूल्यांवर प्रभावी विचार मांडले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सफूरा शेख, द्वितीय तय्यबा तहसीलदार तर तृतीय क्रमांक अफीफा बागवान यांनी पटकावला.
अरबी उर्दू मराठी स्कूल, मिरज येथे निबंध स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक साकिब सौदागर, द्वितीय आयत शेख आणि तृतीय सिध्दीका पटेल यांनी मिळवला. तसेच चाँद उर्दू स्कूल, मिरज येथे लहान गटासाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनकार्यावरील माहिती सादर केली. या स्पर्धेत प्रथम सफा काझी, द्वितीय नुरमहंमदखान खानजादे आणि तृतीय रिजा मोमीन यांना क्रमांक मिळाला.
जवाहर मुला-मुलींची उर्दू प्राथमिक शाळा, मिरज येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाण, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांच्या सहभागामुळे शहीदी समागमाबाबत व्यापक जनजागृती होत असून नवी मुंबई येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.