संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न
अतिग्रे, (कोल्हापूर) :सलीम मुल्ला
दि.१८: उद्योजकतेची बीजे रुजविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.या कार्यशाळेत एकूण २६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विविध विभागांतील ३० संघांनी आपापली समस्या निवेदने (प्रॉब्लेम स्टेटमेंट) शॉर्टलिस्ट करून त्यांचे प्रभावी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकता, सर्जनशीलता आणि सामाजिक भान यांचे उत्कृष्ट दर्शन या सादरीकरणांतून घडले. कार्यशाळेची सर्व उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण झाली.

कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुधीर एम. अराळी, सीईओ, के आय टी इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन, कोल्हापूर यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप उभारणीची संकल्पना, समस्या ओळख व त्यावर उपाययोजना, व्यवसाय मॉडेल कॅनव्हास, निधी संधी आणि नवउद्योजकतेतील आव्हाने याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना “नोकरी शोधणारे नव्हे, तर नोकरी निर्माण करणारे व्हा” असा प्रेरणादायी संदेश दिला.
कार्यशाळेचे अध्यक्ष इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी प्रमुख मार्गदर्शकांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत स्टार्टअप व इनोव्हेशनचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन आणि संस्थेच्या हब उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली.

कार्यशाळेचे संयोजन इन्स्टिट्यूटच्या EDP & TBI सेलतर्फे करण्यात आले. सेलचे प्रमुख प्रा. अजय बी. कोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सर्व विभागाचे प्रमुख प्रा. प्रशांत पाटील, प्रा. नितीन पाटील, प्रा. रईसा मुल्ला, प्रा. वंदना शहा तसेच अभियांत्रिकी डिप्लोमा तृतीय वर्षातील सर्व विभागांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष, उद्योजकता आणि आत्मनिर्भरतेची प्रेरणा निर्माण करणारी ठरली असून भविष्यातील यशस्वी स्टार्टअप्सची पायाभरणी यामधून होईल, अशी भावना आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी सुहाना चौगले हिने केले, तर प्रा. अजय कोंगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. संजय घोडावत विद्यापीठ चे चेअरमन संजय घोडावत तसेच विश्वस्त विनायक भोसले यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.