सांगली:प्रतिनिधी
दि. १४ – सांगलीतील कौटुंबिक न्यायालयाचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त “नांदा सौख्यभरे” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात न्यायालयाच्या माध्यमातून समेट साधून पुन्हा एकत्र आलेल्या जोडप्यांना कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश सुनिता तिवारी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात न्यायालयात आलेल्या पक्षकारांच्या बालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन व वृक्षारोपणाने झाली. अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश सुनिता तिवारी यांनी कौटुंबिक वादांचे वैकल्पिक निवारण, तसेच मुलांच्या हक्कांचे संगोपन आणि संस्कारांचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी न्यायालय फुलांनी व फुग्यांनी सजवण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सांगतेस पक्षकारांच्या मुलांसोबत केक कापण्यात आला. श्री. सुहास धोतरे यांनी गीत सादर करून वातावरण आनंदमय केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना व संकल्पना समुपदेशक ज्योती बावले-भालकर यांनी मांडली. यावेळी जेष्ठ विधीज्ञ किरण पाटील, शकील पखाली, जयंत नवले, गणेश भोई, तेजस सन्मुख, शितल सावंत, पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र वायदंडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय लोणकर यांनी केले, तर सहाय्यक अधीक्षक शैलजा वेदपाठक यांनी आभार मानले.
याप्रसंगी न्यायालयाचे प्रबंधक एस. व्ही. दांडेकर, विकास राऊत, महेश खटावकर, श्रृती दुधगावकर, सुनिता चौगुले, प्रतिभा महाडीक, शरद चांदवले, सुहास धोतरे, तृप्ती फासे, अंगरक्षक अश्विन सोनेकर, महिला पोलिस नगिना पाटील तसेच विधीज्ञ व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.