कोल्हापूर:प्रविण भोसले
दि. २९ : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार विभागातील उपनिबंधक व सहाय्यक निबंधक यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) यांच्या शिरगाव येथील दुग्ध प्रकल्पास सदिच्छा भेट देऊन संघाच्या कार्यपद्धतीची पाहणी केली. यावेळी दूध संकलन, प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच दूध उत्पादक सभासदांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व सेवासुविधांची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली. गोकुळ परिवारातर्फे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे तसेच सदस्य सागर बलकवडे व डॉ. चंद्रकांत परुळेकर यांच्या हस्ते उपस्थित अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी हातकणंगलेचे उपनिबंधक नारायण परजणे म्हणाले, “गोकुळ दूध संघ हा राज्यातीलच नव्हे तर देशातील सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य व आदर्श दूध संघ आहे. प्रत्यक्ष प्रकल्पाला भेट दिल्यानंतर येथील स्वच्छता, शिस्तबद्ध व्यवस्थापन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, उत्पादन प्रक्रियेतील गुणवत्ता नियंत्रण आणि नियोजनबद्ध कार्यपद्धती पाहून समाधान वाटले. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत ग्राहकांना दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देण्याचे गोकुळचे कार्य निश्चितच सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे. संघाच्या प्रगतीमध्ये पदाधिकारी, दूध उत्पादक सभासद, दूध संस्था, अधिकारी, कर्मचारी, वितरक आणि ग्राहक या सर्व घटकांचे मोलाचे योगदान आहे. गोकुळमधील आधुनिक दूध प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची आणि संघाच्या कामकाजाची माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली. तसेच गोकुळच्या दर्जेदार दुग्धजन्य उत्पादनांचा आस्वादही घेतला. भविष्यातही गोकुळ दूध संघ प्रगतीची नवी शिखरे गाठत राहो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.”
यावेळी डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांनी दूध संकलनापासून प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, अत्याधुनिक यंत्रसामग्री, उत्पादन व्यवस्थापन आणि ग्राहकांपर्यंत दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थ पोहोचविण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती दिली. कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी दूध उत्पादक सभासदांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, सेवा-सुविधा, संघाचे गुणवत्ता धोरण तसेच सहकार क्षेत्रातील गोकुळच्या योगदानाचा आढावा उपस्थित अधिकाऱ्यांसमोर मांडला.
या भेटीमुळे सहकार विभाग आणि गोकुळ दूध संघ यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत होणार असून, सहकार क्षेत्रातील आदर्श कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी अशा सदिच्छा भेटी उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.