कडवईत आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती उत्साहात साजरी

 

कडवई:(विशेष प्रतिनिधी)

कडवईतील मंथन बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या आणि बचत गटाच्या सदस्या मिताली कडवईकर यांच्या घरी शिवजयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली.

शिवप्रतिमेची सुंदर फुलांनी व पानांनी सजावट करण्यात आली होती. विशेष आकर्षण म्हणजे शिवरायांच्या जीवनावरील पुस्तकांची मांडणी, जी उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली. कार्यक्रमात सहभागी सर्व महिलांना ‘शिवाजी कोण होता?’ ही पुस्तिका देऊन सन्मानित करण्यात आले.

या वेळी मिताली कडवईकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे संघटन व व्यवस्थापन कौशल्य यावर सखोल माहिती दिली. उपस्थित महिला आणि सदस्यांनी त्यांच्याशी संवाद साधत शिवचरित्राबाबत उत्सुकता व्यक्त केली. कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्र चहापानाचा आनंद घेतला.

या कार्यक्रमाला बचत गटाच्या अध्यक्षा वैष्णवी रेडीज, सुप्रिया साळुंखे, राणी साळुंखे, श्वेता गोरीवले, सुनंदा कडवईकर यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मिताली कडवईकर यांच्या कन्या मनश्री व मंजुश्री यांनी विशेष मेहनत घेतली.

शिवचरित्राच्या अध्ययनासह पार पडलेला हा आगळावेगळा शिवजयंती सोहळा उपस्थितांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.