इचलकरंजी : विजय मकोटे
दि ८ मार्च, 2025 :आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘सुजाण माता महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सौ प्रिया कृष्णाजी बोहरा या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ए. एस. काजी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी उपमुख्याध्यापक श्री व्ही. एन. कांबळे, उपप्राचार्य श्री व्ही. जी. पंतोजी, पर्यवेक्षक श्री एस. व्ही. पाटील, पर्यवेक्षक श्री एस. एस. कोळी उपस्थित होते. यानिमित्त माता पालकांना प्रशालेत निमंत्रित करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सौ. प्रिया बोहरा यांच्या हस्ते श्रीमंत गंगाबाई माईसाहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. संगीत शिक्षिका सौ. ए. ए. रानडे व संगीत मंचच्या विद्यार्थिनींनी ‘स्वागतम, शुभ स्वागतम, आनंद मंगल मंगलम.’ हे स्वागतगीत सादर केले. प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री व्ही. एन. कांबळे यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी ‘८ मार्च’ या दिनाचा इतिहास सांगून, महिला दिनाचे महत्त्व विशद केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ए. एस. काजी यांनी प्रमुख पाहुण्या सौ. प्रिया बोहरा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आपल्या प्रमुख मनोगतात सौ. प्रिया बोहरा यांनी महिलांच्या प्रचंड कार्यक्षमतेविषयी गौरवोद्गार काढले. त्या म्हणाल्या, “लहान मुलांच्या समोर पहिला आदर्श असतो तो आपल्या आईचा. मुलाच्या प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींमध्ये आई त्याच्याबरोबर उभी असते. सध्याच्या समाजात मुलांना सोशल मिडियावरील अनावश्यक व वाईट गोष्टींपासून दूर ठेवण्याची जबाबदारी मातांनी घेतली पाहिजे. महिलांनी आत्मविश्वासाने जीवनाला सामोरे गेले पाहिजे. आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्वावलंबी बनला तर अनेक गोष्टी करण्यास शक्य होतात. महिलांनी मनात आणले तर त्या कोणतीही गोष्ट करू शकतात.”
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ए. एस. काजी यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्या व सुजाण मातांचे स्वागत केले. स्त्री शिक्षणाच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे त्यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, “आज प्रत्येक मुलगी शिकलीच पाहिजे असा शिक्षण हक्क कायदा सरकारने केला आहे. हा कायदा सांगतोय म्हणून मुलींना शिक्षण देण्यापेक्षा मुलीच्या आणि समाजाच्या विकासासाठी मुलींना शिकवले पाहिजे. आमची गंगामाई प्रशाला मुलींसाठी सुरक्षित वातावरण देणारी आणि मुलींना विविध क्षेत्रांमध्ये प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणारी एक प्रथितयश शाळा आहे. स्त्री शिक्षण आणि मुलींची सर्वांगीण प्रगती करण्याचे हे कार्य आमची प्रशाला गेल्या 57 वर्षांपासून करीत आहे. येथून पुढील काळातही आम्ही हे कार्य जोमाने करीत राहू.” कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कु. राधिका शर्मा हिने छोटे-मोठे खेळ, गाणी, गप्पा, गेम्स यांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. यामध्ये उपस्थित सर्व माता पालक, प्रशालेच्या शिक्षिका उत्साहाने सहभागी झाल्या. यातील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन महिला दिन विभाग प्रमुख सौ. ए. व्ही. मुक्कण्णावर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सलीम मुजावर व श्री आर. एम. गरड यांनी केले. कार्यक्रमास माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.