संगमेश्वर ,दि .१० :– रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण करणाऱ्या स्टॉल धारकाच्या वर्तनामुळे संतापाची लाट उफाळली आहे. स्थानकात पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि कोल्ड्रिंक्स अस्वच्छ आणि अनुचित जागेवर ठेवण्यात आल्याने प्रवाशांनी तक्रार केली असता, त्या स्टॉलधारकाने त्यांना मुजोरी करत हल्ला केला.
सदरची घटना कोकण रेल्वे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांना समजावण्यात आली. त्यांनी तात्काळ स्थानक व्यवस्थापकांना सूचित केले, मात्र पंधरा दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने प्रवाशांमध्ये संताप वाढला आहे.रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात येत असून, संगमेश्वर रेल्वे स्थानकातील स्टॉलचे वाटपही बंधनकारक नियमांचे उल्लंघन करून स्थानिकांऐवजी परप्रांतीय लोकांना दिले जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
एक चहा स्टॉल कोकणी व्यक्तीच्या नावावर असून, त्याचे चालवणारे एक मुजोर असल्याच्या तक्रारी अनेकदा समोर आल्या आहेत. या स्टॉलवर विकल्या जाणाऱ्या पदार्थांची गुणवत्ता खराब असल्याचा प्रवाशांचा तक्रार आहे. तसेच पाणी आणि कोल्ड्रिंक्स गटारावर उघड्यावर ठेवण्याच्या अहवालानंतरही स्टॉल धारकाने तक्रार करणाऱ्या प्रवाशांवर हल्ला केला.रेल्वे विभागीय व्यवस्थापकांनी कारवाईचा आश्वासन दिले असले तरी, अनेक दिवस उलटल्यावरही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.प्रवाशांनी हा स्टॉलधारक त्वरित काढून टाकावा आणि रेल्वे प्रशासनाने सर्व स्टॉलधारकांवर योग्य चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.