रत्नागिरी: नियाझ खान
दि २६ ऑगस्ट: रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) अंमली पदार्थ विरोधी कारवाईत तब्बल २ लाख ४० हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून, एका इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. LCB चे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील खेडशी, वयाळवाडी तसेच शहर परिसरातील रेल्वे स्टेशन, कुंवारबाव, नाचणे व मारुती मंदिर भागात गस्त घालत असताना संशयित इसम आढळून आला.
आठवडा बाजारातील शेडमध्ये पाठीवर सॅक घेऊन फिरणारा इसम संशयास्पद हालचाल करताना दिसला. त्याला चौकशीसाठी थांबवून तपासले असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता सॅकमध्ये दोन पॅकेटमध्ये भरलेला ४ किलो गांजा आढळून आला. या गांजाची व इतर मुद्देमालाची किंमत एकूण ₹२,४०,१००/- इतकी आहे.सदर इसमाचे नाव संदीप रामदास जाधव (वय २९, रा. मारुती मंदिर, लांजा जुनी बाजारपेठ, ता. लांजा, जि. रत्नागिरी) असे असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६३/२०२५ भादंवि अन्वये NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत LCB चे पोलीस अधिकारी व कर्मचारी संदीप ओवळे, शांतराम झोरे, नितीन डोमणे, बाळू पालकर, अनमोल कदम, प्रत्यूष खांबे, दिनेश सावंत, सत्यजीत दरेकर, अनिल कांबळे व दत्ता कांबळे आदींचा सहभाग होता.
या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करीत आहे.