कोल्हापूर:रेणू पोवार
दि .२६: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) संलग्न हातकणंगले तालुक्यातील प्राथमिक दूध संस्थांची संपर्क सभा दि. २१ ऑगस्ट रोजी स्वप्नपूर्ती मंगल कार्यालय, अतिग्रे येथे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.सभेला माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक मंडळाचे मान्यवर, दूध संस्थांचे प्रतिनिधी, तसेच मोठ्या संख्येने दूध उत्पादक उपस्थित होते.
सभेत बोलताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, “गोकुळच्या म्हैस दुधाला शहरी भागात मोठी मागणी असून दूध संकलन वाढवण्यासाठी उत्पादक व दूध संस्था यांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. संस्थापक स्व. आनंदराव चुयेकर साहेबांनी गोकुळची स्थापना केली, यामागचा उद्देश हाच होता की शहरातील पैसा दुधाच्या माध्यमातून ग्रामीण भागात पोहोचावा.”
ते पुढे म्हणाले की, संघाच्या ठेवी तब्बल ५१२ कोटींपर्यंत पोहोचल्या असून २५ लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी म्हैस खरेदी अनुदान ५० हजार रुपये करण्यात आले असून, टी.एम.आर.च्या माध्यमातून सुका चारा उपलब्ध करून देण्याची योजना राबवली जात आहे. “गोकुळची ध्येयधोरणे शाश्वत असून संघ नेहमीच उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील,” असे आश्वासनही त्यांनी दिले.
सभेत उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेतल्याबद्दल चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळाचे अभिनंदन ठरावाने करण्यात आले. किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत सभासदांच्या वारसांना व मृत जनावरांच्या मालकांना विमा धनादेशांचे वाटप करण्यात आले. तसेच विविध दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्नांवर चर्चा करून अडचणींचे निरसन करण्यात आले.
यावेळी संघाचे माजी चेअरमन विश्वास पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे व संचालक मुरलीधर जाधव यांनी मार्गदर्शन केले. स्वागत व प्रस्ताविक डॉ. सुजित मिणचेकर यांनी तर आभार प्रदर्शन सौ. शौमिका महाडिक यांनी केले.
या कार्यक्रमाला चेअरमन नविद मुश्रीफ यांच्यासह संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, रणजितसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, चेतन नरके, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका सौ. अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले तसेच अधिकारी, कर्मचारी, दूध संस्था प्रतिनिधी व दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते