शहापूर :राम आवळे
दि .२६: शहापूर परिसरात अल्पवयीन मुलीवरील झालेल्या अत्याचार प्रकरणात फिर्याद स्वीकारण्यास झालेल्या दिरंगाईने संतापाची लाट उसळली आहे. पोलिस निरीक्षक सचिन सुर्यवंशी यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, असा गंभीर आरोप करत त्यांच्या तात्काळ निलंबनाची मागणी करण्यात आली. या मागणीसाठी नागरिक, महिला संघटना, सामाजिक संस्था आणि पीडित कुटुंबीयांच्या उपस्थितीत शहापूर पोलिस ठाण्यासमोर चार तास तीव्र लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आपण स्वतःही या उपोषणात सहभागी झाल्याने या आंदोलनाला आणखी ठाम दिशा मिळाली.
चार दिवसांपूर्वी घडलेल्या या अत्याचार प्रकरणात गुन्हा तातडीने दाखल न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी यापूर्वीच पोलिस प्रशासनाला उलट उलट इशारा दिला होता. त्यानुसार आजच्या उपोषणाची दखल अखेर पोलिस यंत्रणेला घ्यावी लागली. अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी उपोषणस्थळी येऊन शिष्टमंडळाशी चर्चा केली.
यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी पोलिस निरीक्षक सुर्यवंशी यांच्या कार्यपद्धतीतील सातत्यपूर्ण त्रुटी, नागरिकांच्या तक्रारी आणि त्यांच्या वर्तनशैलीचा मुद्दाम पाढा वाचून दाखवत संताप व्यक्त केला.
“पोलिसांची खाकी वर्दी जनतेच्या सुरक्षेसाठी आहे; गुन्हे दडपण्यासाठी नव्हे. लोकांचा विश्वास ढासळवणार्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.
अप्पर पोलीस अधीक्षकांनी प्रकरणातील प्रत्येक त्रुटीची तपासणी करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन केल्याची माहिती देत चार दिवसात अहवाल देण्याचे आश्वासन दिले. मात्र आंदोलनकर्त्यांनी ही मुदत पुरेशी नसल्याचे सांगून कडक भूमिका घेतली.
“चार दिवस नाही, आठवडा घ्या! पण आठवड्यात ठोस निर्णय न झाल्यास आम्ही याच ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू करू,” असा जाहीर आणि सज्जड इशारा देत आंदोलनकर्त्यांनी पोलिस प्रशासनाचे कान टोचले.
शहापूरात या प्रकरणामुळे तीव्र असंतोष निर्माण झाला असून, कारवाई न झाल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन पेट घेण्याची शक्यता आहे.