सांगली:-अय्यान पटेल
दि:-१० मानवी हक्क दिनाचे औचित्य साधत मिरजच्या आस्था बेघर महिला निवास केंद्रातील महिलांना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते रेशन कार्ड, आयुष्मान व आभा कार्ड देण्यात आले. यामुळे आता त्यांनाही शासन योजनांचा लाभ मिळणार
मिरज येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरजचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, मिरज तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, महानगरपालिकेच्या उपायुक्त अश्विनी पाटील, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोलंकी, आरोग्य अधिकारी सुचिता पवार आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आस्था बेघर महिला निवास केंद्र मिरज येथील 9 बेघर महिलांना रेशनकार्ड, 2 महिलांना आयुष्मान कार्ड तर 4 महिलांना आभा कार्ड वाटप केले. या महिलांना रेशनकार्ड मिळाल्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. यावेळी महिलांनी आनंद व्यक्त करताना रेशनकार्ड मिळाल्यामुळे आता लाडकी बहीण योजनेसह अन्य योजनांचा लाभ घेता येईल, अशी प्रतिक्रिया दिली. ज्या महिलांकडे आधारकार्ड नाही त्यांना आधारकार्ड देण्याची कार्यवाहीही सुरू आहे. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी महिला ज्या ठिकाणी राहतात तेथील प्रत्यक्ष जावून पाहणी केली व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. काही महिलांनी त्यांच्या आरोग्यविषयक अडीअडचणी सांगितल्या. यावर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना आवश्यक त्या तपासण्या तातडीने करून पुढील योग्य उपचार करण्याचे निर्देश यावेळी दिले.