सागरेश्वर अभयारण्य पर्यटनवृध्दीसाठी सर्वंकष आराखडा करा : जिल्हाधिकारी अशोक काकडे

सागरेश्वर अभयारण्याच्या पाहणीत अधिकाऱ्यांना सूचना

 सांगली:अय्यान पटेल

दि.८:  सांगली जिल्ह्याच्या विकास आराखड्यांतर्गत सागरेश्वर अभयारण्य पर्यटन वृध्दीसाठी सर्वंकष आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या. या अनुषंगाने सागरेश्वर अभयारण्य येथील शासकीय विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय वन अधिकारी श्रीकांत पवार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, नायब तहसिलदार सागर कुलकर्णी, सु. धो. मोहिते आदि उपस्थित होते.

            निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या वैभवात भर टाकण्याबरोबरच या भागाचा कायापालट होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पर्यटनाच्या सर्वंकष आराखड्यात कृषि पर्यटन, कौशल्य विकास प्रशिक्षण, स्थानिकांना रोजगार अशा विविध माध्यमातून सन 2030 पर्यंत जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे सूचित केले.सागरेश्वर अभयारण्य हे एक मानव निर्मित अभयारण्य असून हे अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट असे ठिकाण असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, या अभयारण्यामध्ये सांबर, चितळ, ससे आणि अनेक प्रकारचे प्राणी दिसतात. सांगलीतीलच नाही तर महाराष्ट्रातील पर्यटकांनी सागरेश्वर अभयारण्याला भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी सागरेश्वर पर्यटनवृद्धीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अधिकारी व स्थानिकांशी संवाद साधला. तसेच, त्यांच्याहस्ते सागरेश्वर अभयारण्य येथे वृक्षारोपण करण्यात आले.