स्व. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुढील स्मृतीदिनी २५ लाख लिटर दूध संकलनाने अमृत कलश पूजन होईल : नामदार हसन मुश्रीफ

कोल्‍हापूर: रेणू पोवार

दि.१६: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने गोकुळचे शिल्पकार स्व. आनंदराव ज्ञा.पाटील (चुयेकर) यांच्या १२ व्या पुण्यतिथीनिमित्य प्रतिदिन २० लाख लिटर्स दूध संकलन पूर्तीचा अमृत कलश पूजन कार्यक्रम गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे संपन्न झाला. हा अमृत कलशाचे पूजन गोकुळ मध्ये कार्यरत असलेले ११ ज्येष्ठ कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ व सर्व संचालक मंडळ, प्रमुख मान्यवर उपस्थितीत होते.

          यावेळी स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांचा हस्ते पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले.  यावेळी बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफसो म्हणाले, “मागील वर्षी स्व. आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पुण्यतिथीला १८ लाख लिटर दूध संकलनाचे अमृत कलश पूजन केले होते. त्यावेळी २० लाख लिटरचा संकल्प केला होता आणि आज तो यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे, याचा मला अत्यंत आनंद आहे.”   ते पुढे म्हणाले की, आज एकूण २१ लाख ९६ हजार लिटर दूध संकलन झाले आहे. या यशामागे गोकुळच्या दूध उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी आणि संचालक मंडळाचे मोठे योगदान आहे. सर्वांचे मनापासून अभिनंदन केले, व पुठे बोलताना म्हणाले “दूध उत्पादक हा केंद्रबिंदू मानून संघाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात सक्रियपणे काम करणे गरजेचे आहे. चारा व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान, म्हैशींचे आरोग्य यावर विशेष लक्ष दिले पाहिजे.” म्हैस दूध वाढीसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने मोठी भूमिका घेतली असून दोन जातिवंत म्हैशी खरेदीसाठी गोकुळच्या सुपरवायझरच्या शिफारशीवर विनातारण कर्ज योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ तसेच इतर महामंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दूध उत्पादकांनी या योजनांचा लाभ घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.

          संघाच्या पायाभूत सुविधा व विस्तार, आईस्क्रीम प्रकल्प, पुणे व मुंबईतील विस्तार योजना, तसेच दूध संकलनाचा मासिक आढावा नियमितपणे घेण्याचे निर्देश त्यांनी संचालक मंडळाला दिले. स्व. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुढील स्मृतीदिनी २५ लाख लिटर दूध संकलनाने अमृत कलश पूजन होईल,असा मला पूर्ण विश्वास आहे,” असे मत यांनी व्यक्त केले.