इचलकरंजी: विजय मकोटे
तारदाळ येथे कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रिरल इस्टेट अॅण्ड इंटिगे्रटेड टेक्स्टाईल पार्क (केएटीपी) येथे तयार करण्यात आलेल्या वाहन पासिंग ब्रेक टेस्ट ट्रॅक उद्घाटनावरुन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रश्न उपस्थित केला. वेळ मिळत नसेल तर ऑनलाईन उद्घाटन झाल्याचे जाहीर करा म्हणजे त्याठिकाणचे कामकाज सुरु करता येईल, अशी मागणी केली. त्यावर राज्याचे परिवहन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवार 13 नोव्हेंबर रोजी पासिंग ट्रॅकचे उद्घाटन निश्चितपणे करण्यात येईल अशी ग्वाही दिल्याने ट्रॅकचे कामकाज सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
केएटीपी या संस्थेच्यावतीने आमदार प्रकाश आवाडे यांच्या पुढाकाराने तारदाळ येथील संस्थेच्या जागेत स्वखर्चातून शासन नियमाप्रमाणे वाहन पासिंग ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करुन देण्यात आला आहे. परंतु मध्यंतरीचा कोरोना महामारीचा काळ सोडला तर अद्यापही हा ट्रॅक उद्घाटनच्या प्रतिक्षेत आहे. याच्या उद्घाटनासाठी आमदार आवाडे यांनी आंदोलनाचा मार्गही पत्करला होता. त्यानंतरही हा ट्रॅक तसाच आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये आमदार प्रकाश आवाडे यांनी ट्रॅकच्या उद्घटनाचा प्रश्न मांडला. ते म्हणाले, हा ट्रॅक पूर्ण होऊनही इचलकरंजीसह हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील वाहनधारकांना कोल्हापूरला फेर्या माराव्या लागत आहेत. या ट्रॅकच्या उद्घाटनासाठी राज्याचे परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांना वेळ मिळत नसेल किंवा त्यांच्यावर वरुन दबाव टाकला जात असेल त्यामुळे ते नसतील असे सांगत वेळ मिळत नसेल तर पासिंग ट्रॅकचे ऑनलाईन उद्घाटन झाल्याचे जाहीर करा म्हणजे कामकाज सुरु होऊन वाहनधारकांना दिलासा मिळेल असे सांगितले. त्यावर पालकमंत्री पाटील यांनी येत्या शनिवार 13 नोव्हेंबर रोजी पासिंग ट्रॅकचे उद्घाटन करण्यास येऊ अशी ग्वाही दिली.