इचलकरंजी: संजय आंबे
दि:१० नोहेंबर मावळत्या सूर्याची विधीवत पद्धतीने पूजा करून उत्तर भारतीय बांधवांनी बुधवारी सायंकाळी पंचगंगा नदीघाटावर छठपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली. व्रतस्थ महिलांनी नदीपात्रात उभे राहून सूर्याला नैवेद्य दाखवून त्याची पूजा केली. उत्तर पूर्वोत्तर जनसेवा संघाच्यावतीने छठपूजेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान आज, गुरुवारी पहाटे पंचगंगा नदीवर छठपूजेची सांगता होणार आहे. यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी पुजेच्या ठिकाणी भेट देऊन उत्तर भारतीयांना शुभेच्छा दिल्या.
छठ पूजा हा सूर्य देवाला समर्पित सण आहे, जो दिवाळीनंतर सात दिवसांनी साजरा केला जातो. हा देह आणि आत्मा शुद्धता, सत्य, अहिंसा, क्षमा आणि करुणा यांचा उत्सव आहे. कार्तिक महिन्यात बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्येही हा सण साजरा केला जातो. यादिवशी सूर्यदेवाची पूजा नदी, तलाव किंवा तलावासारख्या जलकुंभात केली जाते, असे म्हणतात की छठ सणात सूर्याची उपासना केल्याने छठ मातेला आनंद मिळतो आणि कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते.
कोरोना महामारीच्या संकटामुळे मागील वर्षी शासन निर्बंधामुळे घरोघरीच छठपुजा साजरी करावी लागली होती. यंदा मात्र उत्साहात पुजा पार पडली. येथील पंचगंगा नदी घाटावर मंगळवारी सायंकाळी महिलांनी मोेठी गर्दी केली होती. नदीच्या पाण्यामध्ये उभे राहून व्रती सूर्याचे ध्यान करीत अर्ध्य दिले. यानिमित्त पंचगंगा नदीघाटावर ऊसाची पूजा उभारली होती. गहू, तूप, गूळ यांपासून तयार केलेला पदार्थांचा नैवेद्य व पूजेसाठी पाच फळे आणली होती. गुरुवारी पहाटे 5 वाजता छठपुजेची सांगता होईल. यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी पुजास्थळी भेट देऊन उत्तरभारतीयांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी नगरसेवक सुनिल पाटील, संजय केंगार, जवाहर कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, उत्तर पूर्वोत्तर जनसेवा संघाचे अध्यक्ष विवेक पांडे, उपाध्यक्ष अर्जुन सहानी, सेक्रेटरी हरेराम तिवारी, संतोष कुशवाह, रामनारायण मिश्रा, रामहरक मिश्रा, जयप्रकाश तिवारी, राम परवेस आदींसह उत्तर भारतीय बांधव उपस्थित होते.