सांगली:आयन पटेल
दि. १३ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, सामाजिक समता सप्ताहांतर्गत मिरज तालुक्यातील विजयनगर ग्रामपंचायत येथे स्वच्छता मोहीम आणि 135 वृक्षांचे रोपण करण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. वृक्षारोपणानंतर संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
याप्रसंगी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, विजयनगरच्या प्रशासक दीपाली कुल्हाळ, माजी उपसरपंच सारिका कोरे, आशा आवळे, पोलिस पाटील सीमा कांबळे, ग्रामसेवक जयश्री नागरगोजे, माजी सरपंच राजू कोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार कोरे, इतर मान्यवर तसेच समाज कल्याण विभागाचे कर्मचारी, समतादूत व इतर नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांची रुजवण व्हावी, या उद्देशाने गावातील प्रत्येक घरात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतींचे वाटप करण्यात आले.