ठाणे: प्रतिनिधी
दि. १८ : जागतिक वारसा दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने “बहुसांस्कृतिक ठाणे” या हेरिटेज वॉकचे आयोजन उत्साहात करण्यात आले. शहरातील विविध संस्कृतींचा संगम आणि ऐतिहासिक वारशाची ओळख करून देणारा हा उपक्रम ठरला.हेरिटेज वॉकची सुरुवात कोपिनेश्वर मंदिर येथून करण्यात आली. त्यानंतर सहभागी नागरिकांनी मासुंदा तलाव, सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च, पारसी सिनेगॉग, जैन मंदिर तसेच मुस्लिम समाजाचे सामाजिक भवन अशा विविध स्थळांना भेट दिली. या वारशाच्या प्रवासाचा समारोप टाऊन हॉल येथे करण्यात आला.
या उपक्रमात अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी शशिकांत गायकवाड, कल्याण प्रांताधिकारी विश्वास गुजर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्वला सपकाळे, तहसिलदार सचिन चौधर, अमोल कदम, उमेश पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी आदींसह अनेक अधिकारी उपस्थित होते.
हेरिटेज वॉकदरम्यान संदेश अवडण यांनी मार्गदर्शक म्हणून प्रभावी भूमिका बजावत प्रत्येक स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व, पार्श्वभूमी आणि संदर्भ यांची सविस्तर माहिती दिली. या वेळी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक सदाशिव तेटविलकर, इंटॅकच्या सहसंयोजक ॲड. दिव्या ठाकूर, सिने अभ्यासक संतोष पाठारे, दूरदर्शनच्या निवेदिका मानसी आमडेकर तसेच छायाचित्रकार जय मनोरे यांनी सहकार्य केले.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने व उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाचे नियोजन तहसिलदार सचिन चौधर आणि अश्वमेध प्रतिष्ठानचे संस्थापक व पुरातत्त्व अभ्यासक अविनाश हरड यांनी केले.