इचलकरंजी : प्रतिनिधी
दि.४ : पत्रकार हा समाजाचा आरसा मानला जातो. समाजाला योग्य दिशा देणे, तसेच अनैतिक गोष्टींवर प्रहार करणे ही जबाबदारी पत्रकारितेची असते. त्यामुळे पत्रकाराला समाजात सन्मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. मात्र, अर्धवट ज्ञान आणि बेजबाबदार वर्तनाच्या जोरावर काही जण पत्रकारितेच्या नावाखाली स्वतःचेच दुकान मांडताना दिसत आहेत.
अशाच एका तथाकथित ‘भामट्या पत्रकारा’ने इचलकरंजी शहरात शिरकाव केल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. शहरातील विविध शासकीय व प्रशासकीय कार्यालयांत या व्यक्तीची वाढती वर्दळ संशयास्पद ठरत असून, अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर व्यक्ती स्वतःला पत्रकार म्हणून सांगत असली, तरी त्याच्या बातम्यांचा दर्जा आणि लिखाणाची पातळी अत्यंत सुमार असल्याची चर्चा आहे. नावात ‘गणेश’ धारण करूनही वागण्यात आणि लिखाणात कोणतीही परिपक्वता दिसत नसल्याचे बोलले जात आहे. त्याच्या प्रकाशित बातम्यांचा नमुना पाहिला असता पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांनाही हरताळ फासल्याचे स्पष्ट होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
विशेष म्हणजे, पोलीस ठाण्यात वावरताना ओळखपत्राची विचारणा केल्यावर संबंधित व्यक्ती उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे, तर “आपले वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संबंध आहेत” असा दावा करत अधिकाऱ्यांनाच उलट प्रश्न विचारत उर्मटपणे वागत असल्याची माहिती आहे.
याशिवाय, स्वतःच्या ‘पत्रकारितेच्या कार्याची’ मोठमोठ्याने स्तुती करत फिरणे, तसेच तालुकाभर स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करणे, यामुळे खऱ्या पत्रकारितेची प्रतिमा मलिन होत असल्याची खंत व्यक्त होत आहे.
या प्रकारामुळे काही प्रतिष्ठित संपादकांच्याही विश्वासाला तडा जात असल्याची चर्चा असून, एकंदरच या प्रकरणाने पत्रकारितेच्या विश्वात अस्वस्थता निर्माण केली आहे.दरम्यान, पोलीस प्रशासन आणि शासकीय अधिकाऱ्यांनी सतर्क राहून अशा बनावट व बेजबाबदार व्यक्तींना वेळेत ओळखून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी खऱ्या पत्रकारांकडून होत आहे.