कडवईत ‘तो कोण होता’ नाटकाचा पहिला प्रयोग; रिक्षा व्यावसायिकांच्या नाट्यसंस्थेची दखल

आरवली: दीपक तुळसणकर 

(दि. ४ मे २०२६) — संगमेश्वर तालुक्यातील कडवई बाजारपेठ येथे प्रसिद्ध लेखक यशवंत माणके लिखित ‘तो कोण होता’ या नाटकाचा प्रथम प्रयोग उत्साहात सादर करण्यात आला. रिक्षा मालक-चालक संघटनेची निर्मिती असलेल्या श्री समर्थ नाट्यगंधा या नाट्यसंस्थेच्या कलाकारांनी प्रभावी सादरीकरण करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. विशेष म्हणजे ही नाट्यसंस्था पूर्णपणे रिक्षा व्यावसायिकांची असल्याने कार्यक्रमाला वेगळेच आकर्षण लाभले.

          या नाटकाचा शुभारंभ प्रयोग कडवई बाजारपेठेत पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये नाटकाच्या पुस्तकाचे शानदार प्रकाशन करण्यात आले. यावेळी श्रीकांत पाटीलभगवान नारकर यांनी मनोगत व्यक्त करताना नाट्यक्षेत्रात सध्या कमी लेखक कार्यरत असल्याचे नमूद केले. कोकणातील लेखक यशवंत माणके यांनी २९ नाटके लिहून तरुणांसमोर आदर्श निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले.

          स्वतः यशवंत माणके यांनीही आपल्या मनोगतात नव्या विषयांवर लेखन करण्याचा मानस व्यक्त केला. तसेच रिक्षा संघटनेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. ‘तो कोण होता’ या नाटकाचा विषय ज्वलंत असून प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

           या सोहळ्यास श्रीपत शिंदे, रमेश खैर, योगेश मांडवकर, आनंद कुमठेकर, संजय पवार, सचिन मिसाळे, पिंट्या खवले, प्राजक्ता पवार, शर्वरी अवसरे, आशिष सरमोकादम, श्रीरंग कुंभार, शशिकांत किंजलकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कुंभार यांनी केले. श्री समर्थ नाट्यगंधाच्या कलाकारांनी आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या गजरात दाद देत नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.