माती परीक्षणाच्या फायद्याबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन

 सांगली:अय्यान पटेल

दि.५कृषी विभागाकडून सांगली येथील शेतकऱ्यांना खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी खरीप पिके घेण्याअगोदर माती परीक्षण करणे किती महत्त्वाचे आहे हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्यात आले. तसेच माती परिक्षणाचे फायदे कोणते होतात, खतांची बचत कशी होते, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

            खरीप हंगामापूर्वी वळवाचा पाऊस सुरू झाला की एप्रिल, मे महिन्यात पिकांना हुमणी किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. याबाबत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकद्वारे हुमणीच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळा तयार करावा, असे आवाहन करण्यात आले. प्रकाश सापळामुळे हुमणीचे भुंगे मृत्यू पडतात व पुढील होणारी उत्पत्ती नष्ट होते. यामुळे पिकांचे नुकसान टाळण्यास मदत होते. त्यामुळे प्रकाश सापळा सर्व शेतकऱ्यांनी वळवाच्या पावसाची सुरुवात झाली की किंवा मे महिन्यात आपल्या शेतात कडुनिंबच्या झाडाखाली, किंवा सुबाभलीच्या झाडाखाली तयार करावा. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान होणार नाही. याबाबत उपकृषी अधिकारी प्रदीप माळी व सहाय्यक कृषी अधिकारी सांगली अमित सूर्यवंशी यांनी सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन व आवाहन केले.

            यावेळी सर्व शेतकऱ्यांनी माती परीक्षण करूनच खरिपातील पिके घेण्याबाबत व भविष्यात उसामधील हुमणीचा प्रादुर्भाव टाळण्याकरता मे महिन्यामध्ये प्रकाश सापळा आपल्या शेतामध्ये करण्याबाबतचा निर्धार केला. तसेच पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, त्यानंतर शेतकऱ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचे ठरविले. या कार्यक्रमास सांगली येथील शेतकरी प्रदीप पाटील, जयवंत पाटील, दिलीप बोलज, शिवाजी चौगुले, अभिजीत शिंदे, सागर पाटील व इतर शेतकरी उपस्थित होते.