इचलकरंजी: विजय मकोटे
दि.६: इचलकरंजी व परिसरातील खर्चीवाल्या (मजुरीने कापड विणून देणाऱ्या) यंत्रमागधारकांचा महत्त्वपूर्ण मेळावा गुरुवार दि. ७ मे २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
सन २०१३ मध्ये झालेल्या यंत्रमाग कामगार आंदोलनानंतर गेल्या १३ वर्षांपासून ट्रेडिंग असोसिएशनकडून खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना कोणतीही मजुरीवाढ देण्यात आलेली नाही. दरम्यान, कामगारांसाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात महागाई भत्त्यावर आधारित ‘पीस रेट’नुसार मजुरीवाढ जाहीर केली जाते. मात्र, यंत्रमागधारकांच्या बाबतीत कोणतीही दरवाढ न दिल्याने नाराजी वाढली आहे.
पूर्वीच्या प्रथेनुसार कामगारांच्या मजुरीवाढीच्या तिप्पट दराने यंत्रमागधारकांना मजुरीवाढ देण्यात येत होती. मात्र २०१३ नंतर ही पद्धत पूर्णपणे बंद झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच काळात कामगारांचे वेतन, वीजबिल, सुटे भाग, हमाली, वहन खर्च आदींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असूनही उत्पन्नात कोणतीही वाढ झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने यापूर्वी अनेक आंदोलने केली होती. तरीही ट्रेडिंग असोसिएशनकडून बैठकीस प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात आले. परिणामी, खर्चीवाल्या यंत्रमागधारकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट बनली असून कुटुंबातील सर्व सदस्य कारखान्यात काम करून संसार चालवत असल्याची स्थिती आहे. या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आयोजित मेळाव्यास सर्व प्रकारच्या क्वालिटी काढणाऱ्या खर्चीवाल्या यंत्रमागधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.