मुंबई: प्रतिनिधी
दि.६: येणारे वर्ष हे बालभारतीच्या स्थापनेचे हिरक महोत्सवी वर्ष आहे. या निमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करुन घ्यावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
बालभारतीच्या नियामक मंडळाची 259 वी सभा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली येथील महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या पार पडली. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी, एससीईआरटीचे संचालक डॉ.हेमंत वसेकर, बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर, उपसचिव तुषार महाजन आदी यावेळी उपस्थित होते.
मंत्री दादाजी भुसे म्हणाले, शाळेच्या पहिल्या दिवशी राज्यात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा केला जातो. याप्रसंगी बालभारतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात यावेत. या माध्यमातून नागरिकांना बालभारती वर्षानुवर्षे करीत असलेल्या सकारात्मक कामांची माहिती देखील होईल. बालभारतीच्या पुस्तकांसाठीचा कागद साठवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जागेची आवश्यकता असते. अशी जागा खरेदी करण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन इतर शासकीय विभागांची जागा उपलब्ध असल्यास तिचा उपयोग करण्यासाठी प्रयत्न करावा. शालेय शिक्षण विभागाच्या विविध शाखांची राज्यात कुठे आणि किती जागा आहे याची एकत्रित माहिती तयार करुन त्याचे सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच या जागांचा विकास करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात याव्यात,असेही मंत्री भुसे म्हणाले.