इचलकरंजी: विजय मकोटे
दि.९: कबनूर येथील शिवाजी कॉर्नर परिसरात घरगुती वादातून पत्नी व दोन मुलांनी मिळून कुटुंब प्रमुखाचा चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाळू बापू बामणे (वय ५८, रा. शिवाजी कॉर्नर, कबनूर, ता. हातकणंगले) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अमोल गणपती बामणे (वय ३७, व्यवसाय पॉवरलूम, रा. सहारा नगर, गल्ली नं. ६, रुई, ता. हातकणंगले) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत बाळू बामणे हे फिर्यादीचे चुलते होत.
या प्रकरणी सुनिता बाळू बामणे (वय ४५), यश बाळू बामणे (वय २०) व ओम बाळू बामणे (वय २३, सर्व रा. शिवाजी कॉर्नर, कबनूर) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे अनुक्रमे मयताची पत्नी व दोन मुले आहेत.
घटना ७ मे रोजी रात्री ८ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी घडली. मयत बाळू बामणे हे दारूच्या नशेत पत्नी व मुलांना वारंवार शिवीगाळ तसेच मारहाण करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याच कारणातून संतप्त झालेल्या आरोपींनी संगनमत करून प्रथम लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर पाठीवर चाकूने वार करून बाळू बामणे यांचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शिवाजीनगर पोलिस अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.