रत्नागिरी : नियाझ खान
दि.२१ जुलै २०२६ : रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने मा. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘Mission Rising Flowers’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षितता, जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विविध शाळांमध्ये जनजागृतीपर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.
या उपक्रमाअंतर्गत मुकुल माधव विद्यालय, रत्नागिरी येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत अमली पदार्थांविरोधातील जनजागृती, वाहतूक नियमांचे पालन, ‘गुड टच–बॅड टच’, स्वसंरक्षण तसेच भविष्यातील करिअरच्या संधी या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन करत त्यांना सुरक्षित, जबाबदार आणि जागरूक नागरिक बनण्यासाठी प्रेरित केले.
दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महमुनी यांनी पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधत याच विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर फसवणूक, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, वाहतूक शिस्त, वैयक्तिक सुरक्षितता आणि स्वसंरक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.
‘Mission Rising Flowers’ या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षितता, अमली पदार्थांविरोधातील जागरूकता, वाहतूक नियमांचे पालन, वैयक्तिक सुरक्षितता, स्वसंरक्षण आणि करिअरविषयक मार्गदर्शन करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, सुरक्षिततेची जाणीव विकसित करणे आणि त्यांचे उज्ज्वल, सुरक्षित व सशक्त भविष्य घडविण्यास हातभार लावणे हा आहे. या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.