इचलकरंजी: सलीम मुल्ला
दि.२२: हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी दिलेले मोलाचे योगदान, उच्च दर्जाच्या साखरेच्या उत्पादनातील उत्कृष्ट कामगिरी तसेच उत्पादन व कार्यपद्धतीतील उल्लेखनीय कार्यक्षमता यांची दखल घेऊन दि शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली या संस्थेने सर्वोत्कृष्ठ पुरस्कार जाहीर केलेला आहे.
१९ऑगस्ट रोजी गोवा येथे संस्थेच्या ८४ व्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था सन १९२५ पासून साखर व संलग्न उद्योगांच्या विकासासाठी सल्ला, मार्गदर्शन, संशोधन व सहभागात्मक कार्यपध्दतीद्वारे कार्यरत असलेली देशातील सर्वोच्च व्यावसायिक संस्था आहे. देशातील साखर व संलग्न उत्पादनांची गुणवत्ता, उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी किफायतशीर व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी ही संस्था सातत्याने प्रयत्नशील असते. साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय योगदान देणारे उद्योगसमूह, व्यावसायिक, तज्ञ व संस्थांचा गौरव करण्यासाठी दि शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास मिळालेला हा पुरस्कार देशातील साखर उद्योगाच्या तांत्रिक प्रगतीस आणि कार्यक्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी महत्वपूर्ण टप्पा ठरेल, असा विश्वास कारखान्याचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी व्यक्त केला. कारखान्यास मिळालेल्या पुरस्काराबद्दल कारखान्यास ऊस पुरवठा करणारे सभासद-शेतकरी, संचालक, ऊस तोडणी मजूर-वाहतूकदार तसेच कारखान्यात काम करणारे सर्व अधिकारी, कर्मचारी कामगार यांचा मोलाचा वाटा आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ संचालक प्रकाशआण्णा आवाडे आणि संचालक आमदार राहूल आवाडे यांनी केले.