शिरोळ: कयूम शेख
दि.२५ जुलै २०२६: ऊस देशातील एकमेव शाश्वत आणि व्यावसायिक शेतीचे पीक आहे. ऊस आळशी शेतकऱ्यांचे पीक झाले आहे हा समज खोडून काढून, नुकसानीत न जाता आपल्या मध्ये बदल करणे आवश्यक आहे. स्वतःच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बघून शेतकऱ्यांनी शेतीला व्यवसाय म्हणून करण्याची गरज आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी मानसिक स्थिती बदलावी. श्री दत्त कारखान्याच्या वतीने शेती मेळाव्यांतून शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीची माहिती आणि तंत्रज्ञान देण्याचे काम कौतुकास्पद आहे, असे मत कृषी शास्त्रज्ञ डॉ. शांतीकुमार पाटील यांनी व्यक्त केले.श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दानोळी येथे श्री महादेव मंदिर हॉलमध्ये दानोळी, कवठेसार परिसरातील शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
डॉ. शांतीकुमार पाटील यांनी ‘जमिनीची सुपीकता, उत्पादकता व ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान’ याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. पिकाच्या आरोग्य शास्त्राचा शेतकऱ्यांना अभ्यास हवा असे सांगून ते म्हणाले, मातीची भौतिक, जैविक व रासायनिक सुपीकता चांगली पाहिजे. सगळी अन्नद्रव्ये पिकाला मिळावीत यासाठी भौतिक, जैविक व रासायनिक सुपीकता आपल्या मातीत पाहिजे. पाचट सरीत टाकून कुजविणे, शेणखताचा वापर, हिरवळीची खते, गांडूळ खत यांचा वापर करण्याचा सल्ला त्यांना दिला. सरीतील अंतर, सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाने ऊस बियाणे लावण्याची पद्धत, खत व्यवस्थापन, खत टाकण्याची पद्धत, पाणी व्यवस्थापन, बाळ भरणी, पक्की भरणी, खोडवा, निडव्याचे व्यवस्थापन, मशागतीचा खर्च आदींची माहिती दिली.
महाधनचे अधिकारी रवी वाघमारे यांनीही महाधनच्या विविध उत्पादनांची माहिती सांगून शेतकऱ्यांनी त्यांचा वापर करून आर्थिक सुबत्ता मिळवावी असे आवाहन केले.मेळाव्याचे अध्यक्ष बळवंत कुलकर्णी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन झाले. स्वागत महालिंग पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सुनील कदम यांनी केले तर आभार मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी मानले.
यावेळी ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, ऊस पुरवठा अधिकारी पी. एस. देसाई, महादेवराव धनवडे, गुलाब पाटील, सुभाष पाटील, पै. केशव राऊत, केशव राऊत, गुंडुनाना दळवी, सुरेश माणगावे, सुनील होगले, वसंतराव भुस्साण्णा, विजय दळवी, संदीप हवलदार, अशोक पुजारी, राजेश विभुते, मानाजीराव भोसले, बापूसो चौगुले, शंकर लंबे, प्रकाश भोकरे, विजय चिवटे यांच्यासह कारखान्याचे शेती अधिकारी, मदतनीस, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.