मौजे कुंभारखाणी बुद्रुक ग्रामोत्कर्ष संघ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कुंभारखाणी बुद्रुक येथे शैक्षणिक दाखला शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : सचिन पाटोळे 

दि.२६ जुलै २०२६ : संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर, कुंभारखाणी बुद्रुक येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी आवश्यक असलेले जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास दाखला तसेच इतर शासकीय दाखल्यांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.ग्रामीण भागातील पालकांना विविध शासकीय दाखल्यांसाठी वारंवार तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत असल्याने वेळ, पैसा व श्रम यांचा मोठा अपव्यय होत होता. ही गैरसोय लक्षात घेऊन प्रशाळा व शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेत शाळेच्या परिसरातच शिबिराचे आयोजन केले. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना एकाच ठिकाणी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध झाली.


या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून विविध दाखल्यांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक योजना तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.
शिबिर यशस्वी करण्यासाठी आरवली महा ई-सेवा केंद्राचे चालक लतेश म्हसकर, सचिन पाटोळे, कुंभारखाणी साजाचे तलाठी चौरे, मुरडव साजाच्या तलाठी शीतल कदम तसेच ओंकार साळवी यांनी विशेष सहकार्य केले. उपस्थित अधिकाऱ्यांनी पालकांच्या शंकांचे निरसन करून आवश्यक मार्गदर्शनही केले. ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांच्या सोयीसाठी अशा प्रकारची शिबिरे नियमितपणे आयोजित केल्यास शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि लोकाभिमुख होतील, अशी भावना उपस्थित पालकांनी व्यक्त केली. शाळेच्या या उपक्रमाचे परिसरातून सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.