श्री दत्त कारखान्याचे प्रति टन रुपये 50 प्रमाणे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा… गणपतराव पाटील

शिरोळ : कयुम  शैख 

दि.१७ : श्री दत्त कारखान्याने नेहमीच शेतकरी हितास प्राधान्य देऊन जास्तीच्या दराची परंपरा जोपासली आहे. गळीत हंगाम २०२५-२६  मध्ये कारखान्याने गळीतास उपलब्ध होणाऱ्या उसास हंगामात एक रकमी प्रतिटन ३४५० व सन २०२६ च्या दीपावली पूर्वी उर्वरित प्रति टन रु. ५० असा एकूण प्रति टन रुपये ३५०० दर जाहीर केला होता. त्याप्रमाणे कारखान्याने गळीतास उपलब्ध झालेल्या उसास प्रति टन ५० रु. प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दिनांक १७ ऑगस्ट रोजी वर्ग केले आहेत अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी दिली.

गळीत हंगाम सन २०२५-२६ मध्ये कारखान्याने ११,७८,७०५ मे. टन उसाचे गाळप केले होते. गाळपास उपलब्ध झालेल्या या उसास हंगाम कालावधीत प्रचलित पद्धतीनुसार एकरक्कमी विना कपात प्रति टन रु ३४५० प्रमाणे ऊस दर अदा केला होता. हंगाम सुरुवातीस व्यवस्थापनाने जाहीर केल्याप्रमाणे आता प्रति टन रुपये ५० प्रमाणे रुपये ५कोटी ८९ लाख इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर आज वर्ग केली आहे. गळीत हंगाम सन २०२६-२७ करिता कारखान्याने १४ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या उद्दिष्ट पूर्तीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी पिकवलेला व कारखान्याकडे नोंदवलेला सर्व ऊस गाळपास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन याप्रसंगी केले .

यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हा. चेअरमन शरदचंद्र फाटक,संचालक अनिलराव यादव, प्रमोद पाटील,इंद्रजीत पाटील,भैय्यासाहेब पाटील अन्य संचालक कार्यकारी संचालक संजीव देसाई व खाते प्रमुख उपस्थित होते.