निधी वाटपात भेदभावाचा आरोप; महाविकास आघाडीच्या महिला पंचायत समिती सदस्यांचे उपोषण

शिरोळ: कयुम शैख 

दि .१७;  पंधराव्या वित्त आयोगातून पंचायत समितीला मिळणाऱ्या निधीच्या वाटपात विरोधी पक्षाच्या सदस्यांशी भेदभाव केला जात असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या पंचायत समिती महिला सदस्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. गटविकास अधिकारी वर्ग-१ विजयकुमार परिट यांनी पंचायत समिती विकास आराखड्याबाबत लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.पंचायत समिती सदस्या नीलम म्हेत्रे (नांदणी), दीपाली होगले (दानोळी), ज्योती कांबळे (कोथळी) आणि राजश्री मानकापुरे (गणेशवाडी) यांनी यापूर्वी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन पंधराव्या वित्त आयोगाचा निधी सर्व सदस्यांना समान पद्धतीने मिळावा, अशी मागणी केली होती. गावाची लोकसंख्या व क्षेत्रफळ या निकषांनुसार निधीचे वाटप करणे अपेक्षित असून सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव करू नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती.

             या मागणीवर ठोस निर्णय न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही निर्णय न झाल्याने महाविकास आघाडीच्या पंचायत समिती महिला सदस्यांनी सकाळी ११ वाजता पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, श्री दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दरगू गावडे, विक्रम पाटील, सौरभ शेट्टी, तानाजी वठारे, बंडू पाटील, महेश परिट आदींनी गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

             चर्चेनंतर गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांनी लेखी पत्र दिले. शासनाने पंधराव्या वित्त आयोगांतर्गत सन २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीसाठी पंचायत समिती स्तरावरील विकास आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. केंद्र शासनाकडून राज्याला निधी वितरित करताना सन २०११ च्या जनगणनेतील लोकसंख्या आणि क्षेत्रफळ या निकषांचा आधार घेण्यात आला आहे. याच निकषांच्या अधीन राहून पंचायत समिती सभा विकास आराखड्यास अंतिम मान्यता देईल. त्यानंतर प्रशासनाकडून आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे पत्रात नमूद करण्यात आले.   या लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांना सरबत देऊन उपोषण सोडविण्यात आले.

                यावेळी सचिन शिंदे, युनूस पटेल, दानोळी जिल्हा परिषद सदस्या नंदिनी कांबळे, टाकवडे जिल्हा परिषद सदस्या अर्चना चौगुले, जांभळी सरपंच अनुजा कोळी, टाकवडे सरपंच सविता चौगुले, राजगोंडा पाटील, कुमार सुतार, महावीर पाटील, श्रीकांत पाटील, अमोल चौगुले, अरविंद धरणगुत्तीकर, भीमगोंडा पाटील, रघुनाथ म्हेत्रे, जंबूकुमार चौगुले, प्रकाश पाटील, धन्यकुमार कारदगे, दीपक कांबळे, शीतल उपाध्ये, गणपती कोळी, आण्णासाहेब पाटील, बाहुबली चौगुले, दादा चौगुले यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.