महात्मा गांधी जयंतीनिमित्त शहाजी महाविद्यालयात विविध उपक्रम

कोल्हापूर: प्रवीण भोसले 

दि. २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करून गांधीजींना अभिवादन करण्यात आले. गांधीजींचे सत्य, अहिंसा व प्रामाणिकतेचे विचार आजच्या काळातही तितकेच गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी केले. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे सभागृहात ‘महात्मा गांधीजींना समजून घेताना’ या विषयावर प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांचे विशेष व्याख्यान झाले. समाजशास्त्र विभागाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या ‘सत्याचे प्रयोग’ या पुस्तकावर आयोजित स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. के. एम. देसाई यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शोभा चाळके-म्हमाने यांनी केले, तर आभार डॉ. पल्लवी कोडग यांनी मानले.

          शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावरील ४५ पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संस्था व महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे संयोजन प्रा. विजय देठे यांनी केले. महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाच्या वतीने ‘अविष्कार’ संशोधन स्पर्धा घेण्यात आली. विविध विभागांतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे संयोजन प्रा. मनोज कांबळे यांनी केले. परीक्षक डॉ. गावडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

           या विविध उपक्रमांना श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे दादा यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. महाविद्यालयाचे प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.