मिरज : मयुरी देशपांडे
दि २८: मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांना अभिवादन आणि भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधत शिवसेना व युवासेनेच्या वतीने मिरज येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहीद जवानांच्या स्मृतींना अभिवादन करण्याबरोबरच रक्तदानातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.या कार्यक्रमास सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगुले आणि वाहतूक पोलीस निरीक्षक रणजीत टिप्पे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख प्रा. मोहन वनखंडे म्हणाले की, २६/११ चा दहशतवादी हल्ला हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस असून, या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान देश कधीही विसरू शकणार नाही. संविधान दिन हा केवळ संविधानाचा गौरव करण्याचा दिवस नसून, लोकशाही मूल्ये, समानता, बंधुता आणि न्यायव्यवस्था अधिक बळकट करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले अधिकार आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांचा वारसा जपत लोकशाही बळकट ठेवण्यासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध आहे. शिवसेना मुख्यनेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना नेते उदय सामंत, शंभूराज देसाई आणि आमदार सुहास बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना व युवासेना राजकीय कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी रक्त सांडले, त्या शूरवीरांना अभिवादन करताना आपणही रक्तदानाच्या माध्यमातून एखाद्या गरजू रुग्णाला जीवनदान देऊ शकतो. शहीदांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचविणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली असल्याची भावना प्रा. वनखंडे यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना व युवासेना सांगली जिल्ह्याच्या वतीने जिल्हाप्रमुख प्रा. मोहन वनखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. नगरसेवक तथा युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक सागर (दादा) वनखंडे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.या उपक्रमातून २६/११ च्या शहीदांचे स्मरण, भारतीय संविधानाचा सन्मान, लोकशाही मूल्यांचे जतन आणि रक्तदानासारख्या समाजोपयोगी कार्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी विलास काका देसाई, माधवराव गाडगीळ, हरिदास लेंगरे, विशाल पाटील, सूरज कासलीकर, रवी नाईक, सुनीता मोरे, रुक्मिणी आंबेगिरी, शोभाताई तोडकर, वंदनाताई चंदनशिवे, सुहाना नदाफ, लतिका शिंगणे, महादेव सातपुते, सूर्यकांत शिंगणे, गजानन मोरे, चंद्रकांत मयगुरे, संदीप दिंडे, मोहन शिंदे, बापू निकम, सोमनाथ हुलवान, समीर लालबेग, श्रेयश गाडगीळ, जाहिर मुजावर, अमोल रणधीर, प्रकाश अहिरे, जब्बार मुजावर यांच्यासह असंख्य शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.