संगमेश्वर –विशाल रापटे
गेले अकरा महिने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरकीरणाचे काम रखडले आहे. महाविकास आघाडीने संगमेश्वर येथे चक्काजाम आंदोलन केले यावेळी शिवसेना माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने,राजेंद्र महाडिक, रोहन बने, संतोष थेराडे,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, शशी चव्हाण, शिरगावकर,राष्ट्रवादीचे विवेक शेरे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक राजेंद्र सुर्वे, हनीफ हरचिरकर,बोदले,भुवड यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला होता. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेले अकरा महिने रखडले आहे. त्यामागून मंजूर झालेला समृद्धी महामार्ग पूर्ण होत आला आहे. ठेकेदार व अधिकारी सूचना देऊनही ऐकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. याप्रश्नी काम न करणाऱ्या ठेकेदारांना धडा शिकवण्यासाठी आज, गुरुवारी मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.वाकेड ते आरवली हे दोन टप्पे प्रामुख्याने रखडले असून, या क्षेत्रात नऊ ते दहा टक्केच कामे झाली आहेत. अनेक ठिकाणी अर्धवट कामांमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहे महामार्गाच्या कामाबाबत जनतेकडून संताप व्यक्त होत असल्याने केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.