संगमेश्वर :प्रतिनिधी
दि१८ : १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती चे औचित्य साधत राज्यस्तरीय भव्य बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी गुरुवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी पत्रकारांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली .रविंद्रजी माने यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. शिवजयंतीचे औचित्य साधून युवा कार्यकर्ते प्रद्युम्न माने, राजू जाधव, संगमेश्वर तालुका बैलगाडा मालक संघटना यांच्या वतीने या भव्य दिव्य राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . ही स्पर्धा साडवली ता. संगमेश्वर येथील मीनाताई ठाकरे विद्यालयाच्या जवळील मैदानावर पार पडणार आहे.
१९ रोजी दुपारी २ वाजता या स्पर्धेचा शुभारंभ होईल. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास २१ हजार, द्वितीय क्रमांकास १५ हजार, तृतीय क्रमांकास ११ हजार, चतुर्थ क्रमांक ७ हजार, पाचव्या क्रमांकास ५ हजार व प्रत्येकी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाणार आहे. तसेच तीन उत्तेजनार्थ यांची निवड करून त्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाणार आहे . तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण ६० बैलगाड्या सहभागी होणार आहेत. संगमेश्वर तालुक्यात १८ वर्षानंतर एवढी भव्य दिव्य बैलगाडी स्पर्धा रंगणार असल्याचे रविंद्रजी माने यांनी सांगितले . स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, आमदार राजन साळवी, उद्योजक अण्णा सामंत, माजी आमदार सुभाष बने, सदानंद चव्हाण, शिवसेना जिल्हाध्यक्ष विलास चाळके, सचिन कदम, राजेंद्र महाडिक, उदय बने, रोहन बने आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याचे माने यांनी यावेळी सांगितले .