कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ऊसतोडणी मशिन मालक व वाहनधारकांनी आपली वाहने पाठवून शेतकर्‍यांना मदत करावी

साखर संघ मुंबई चे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यां चे आवाहन

हुपरी: प्रतिनिधी

दि.२३एप्रिल: राज्यात अतिरिक्त ऊसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा फटका मराठवाड्यातील शेतकर्‍यांना बसला आहे. अद्याप अनेक शेतकर्‍यांचे ऊस पिक गाळपासाठी न गेल्याने त्या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ऊसतोडणी मशिन मालक व वाहनधारकांनी आपली वाहने पाठवून त्या शेतकर्‍यांना मदत करावी, असे आवाहन साखर संघ मुंबई चे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले आहे. 
हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडा विभागातील ऊस गाळपाबाबत साखर संघ, साखर आयुक्तालय, जिल्ह्यातील गाळप बंद झालेल्या कारखान्याचे चेअरमन, कार्यकारी संचालक तसेच ऊस तोडणी मशिन मालक यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी साखर संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ यांनी, मराठवाड्यातील 52 कारखान्यापैकी अद्याप 46 कारखाने सुरू आहेत. मात्र त्या भागातील शेतकर्‍याचा ऊस गाळप करण्यासाठी तोडणी मशिन व वाहने ही अपुरी पडत आहे. यावर कशी मात करता येईल यासाठी साखर संघाचे वतीने जोरदारपणे प्रयत्न करण्यात येत असून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील तोडणी मशिन मालक व वाहनधारकांनी मदत केल्यास त्यांना योग्य व वाढीव मजुरी देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्‍वासन दिले.
जवाहर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पांना आवाडे यांनी, राज्यातील कोणत्याही भागात काही अडचणी निर्माण झाल्या तर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकरी मदतीचा हात पुढे करतात. आज मराठवाडयातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आपले कर्तव्य समजून त्यांना मदत करावी, असे आवाहन केले.
यावेळी केन कमिटी चेअरमन डॉ. राहुल आवाडे, व्हा. चेअरमन बाबासो चौगुुले, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, संचालक आण्णासाहेब गोटखिंडे, सुरज बेडगे आदीसह कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसतोडणी, मालक, वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.