डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी विकसित केले ‘कुकीज मेकिंग मशीन’

 

इचलकरंजी : विजय मकोटे

दि.२४ मेः डीकेटीई येथील अंतिम वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील ॠषिकेश घुमे, आदिती मगर, फिजा मकानदार आणि श्रदधा पाटील या विद्यार्थ्यांनी प्रा.डॉ.व्ही.डी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कुकीज (बिस्कीट) मेकिंग मशीन’ विकसित केले आहे. या मशिनमुळे कुकीजचे उत्पादन दुप्पट होत असून कमी मनुष्यबळात दर्जेदार उत्पादन बनविण्याची क्षमता या मशिनमध्ये आहे दुकानदार व ग्राहक या दोघांच्या फायदयाचा विचार करुन डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी अधुनिक कुकीज मशिन बनविलेले आहे.
या मशिनमुळे बिस्कीटचे उत्पादन वाढवण्यास मदत होणार असून प्रति मिनिटाला २२० बिस्कीटचे उत्पादन होत असून फक्त १ ते २ कामगारांवर सदर मशिन उत्पादन करु शकते. तसेच अधिक स्वच्छता, कुकीजचा आकार व आकारांची विस्तृत श्रेणी प्रदान करण्यासाठी हे यंत्र सुसज्ज आहे. या यंत्राव्दारे कुकीज एकसमान आकारात, बारीक आणि अचुकपणे कापल्या जातात त्यामुळे वाढीव कार्यक्षमतेसह गुणवत्ता सुधारते. तसेच हे यंत्र मोठया आणि लहान अशा दोन्ही प्रकारच्या उत्पादन आवश्यकतांसाठी संपूर्ण लवचिकता प्रदान करते. जेणेकरुन लहान बेकरी उद्योजकांना देखील मशीन परवडेल आणि त्यांचा व्यवसाय व गुणवत्ता वाढवता येईल सध्या हेे यंत्र मोनोटेक बेकर्स किंग, मांगूर जि. बेळगावी येथे कार्यरत आहे.
डीकेटीई कॉलेज नेहमी समाजोपयोगी उपक्रमावर संशोधन करत असते. हा उपक्रम देखील कुकीज लघुउद्योग क्षेत्राला पूरक असाच आहे. यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त बिस्कीटाचे उत्पादन करता येणार आहे. या संशोधनासाठी विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, विभागप्रमुख प्रा.डॉ.व्ही.आर. नाईक व प्राध्यपकांचे मार्गदर्शन लाभले.