देवगिरी फार्मला राज्य शासनाचा उत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्राचा पुरस्कार

कोल्हापूर,: प्रतिनिधी

दि. 26   जिल्ह्यातील कृषी पर्यटनवाढीसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या देवगिरी फार्म कृषी पर्यटन केंद्रास राज्य शासनाच्या पर्यटन संचलनालयाचा ‘उत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्र’ पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळणारे देवगिरी फार्म हे जिल्ह्यातील पहिलेच कृषी पर्यटन केंद्र असुन राज्यातील 9कृषी केद्रांना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

जागतिक कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय आणि कृषी पर्यटन विकास समितीच्या वतीने राज्यात नाविन्यपूर्ण पद्धती वापरून यशस्वीरित्या कृषी पर्यटनाला चालना देणाऱ्या आणि उत्कृष्ट कार्य केलेल्या केंद्र चालकांना यावर्षीचा उत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्राचा पुरस्कार देण्यात आला. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे केले होते. या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील बांदिवडे ता.पन्हाळा येथील देवगिरी फार्म कृषी पर्यटन केंद्रास गौरविण्यात आले. देवगिरी फार्मचे सुखदेव शामराव गिरी यांनी पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार स्विकारला.

 यावेळी पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलींद बोरीकर, उपसंचालक सुप्रिया करमरकर, महाराष्ट्र कृषी पर्यटन समितीचे पांडूरंग तावरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.