इचलकरंजी : विजय मेकाटे
दि. १२जून : कर्नाटक बेंदूर सणानिमित्त सालाबादप्रमाणे इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळ यांच्यावतीने शतकोत्तर परंपरा असलेल्या ऐतिहासिक लाकूड ओढण्याच्या शर्यतीत दोन दाती गटात सिध्दु भाऊ लवटे यांच्या बैलाने (31.7 सेकंद) प्रथम क्रमांक मिळविला. तर प्रकाश विलास माने व प्रथमेश अनिल शेलार यांच्या बैलांनी 32 सेकंदात शर्यत पूर्ण केली. त्यामुळे चिठ्ठी टाकण्यात आली. त्यामध्ये माने यांच्या बैलाला द्वितीय व शेलार यांच्या बैलाला तृतीय क्रमांक मिळाला.
नारायण मळा येथील डीकेटीई शाळेच्या मैदानात संपन्न या स्पर्धेचा शुभारंभ सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते तर मैदानातील लाकूड पूजन जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, आवाडे जनता बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे व अर्जुन काकणगी यांच्या हस्ते आणि इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते, उपाध्यक्ष नंदू पाटील, खजिनदार अहमद मुजावर, सेक्रेटरी सागर मगदूम आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
दोन गटात एकूण 34 बैलांची नोंदणी झाली होती. सकाळी 9 वाजल्यापासून मैदानाला सुरुवात झाली. प्रेक्षकांना शर्यतीचा आनंद लुटता यावा यासाठी पहिल्यांदाच मैदानात प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. त्यामुळे मैदानातील गर्दी कमी होऊन प्रेक्षकांना शर्यतीचा आनंद घेता आला. मैदान पाहण्यासाठी तरुणवर्गाने मोठी गर्दी केली होती. तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
मोठ्या गटात प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपये, शिल्ड व चांदीची फिरती गदा, द्वितीय क्रमांकासाठी 75 हजार व तृतीय क्रमांकासाठी 51 हजार रुपये अशी बक्षिसे आहेत. उद्या रविवारी ओपन गटातील लाकूड ओढण्याच्या शर्यती तसेच सुट्टा बिनदाती बैल पळविणे स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास 15 हजार, द्वितीय क्रमांकास 11 हजार व तृतीय क्रमांकास 7 हजार रुपये अशी बक्षिसे आहेत. तर मंगळवार 14 जून रोजी जनावरांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. बुधवार 15 रोजी सायंकाळी 5 वाजता गावभाग येथे कर तोडणे व स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न होणार आहे.
यावेळी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधासभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, आदित्य आवाडे, बाबासो पाटील, शिवाजी काळे, प्रशांत कांबळे, दीपक सुर्वे, राहुल घाट, किशोर पाटील, संजय सुतार, रफिक कलावंत, राजेंद्र बचाटे, सागर कम्मे, तानाजी भोसले, सागर गळतगे, इरफान आत्तार, राज दरीबे, बजरंग कुंभार आदी उपस्थित होते.